scorecardresearch

राज ठाकरे यांना धमकी का दिली? शिवाजी महाराजांचं नाव घेत उत्तर प्रदेशमधील भाजपा खासदार म्हणाले, “मराठ्यांनी…”

उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना धमकी का दिली याचं थेट उत्तर दिलं आहे.

उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी हात जोडून माफी मागण्याची मागणी केली. तसेच माफी न मागितल्यास उत्तर प्रदेशात घुसून देणार नाही, अशी धमकी दिली. यावरून ब्रिजभूषण सिंह यांना राज ठाकरे यांना इशारा का दिला असा प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजा, शाहू महाराजांसारखे लोक जन्मले, मात्र त्याच भूमीवर उत्तर भारतीयांना शिवीगाळ करणारा आणि मारहाण करणारा राज ठाकरे नावाचा व्यक्ती जन्मला, असं मत सिंह यांनी व्यक्त केलं. ते एबीपी माझा वृत्तवाहिनीसोबत बोलत होते.

ब्रिजभूषण सिंह म्हणाले, “महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे. तेथे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांसारखे लोक जन्मले आहेत. मराठ्यांनी देशासाठी पानिपतपर्यंत येऊन युद्ध केलंय. हा महाराष्ट्राचा एक अभिमानास्पद इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात प्रत्येक जातीचे त्यांचे विश्वासाचे लोक होते. मात्र, त्याच शिवाजी महाराजांच्या भूमीवर राज ठाकरे नावाचा व्यक्ती जन्मतो. हा व्यक्ती मराठी माणूस आणि उत्तर भारतीय असा मुद्दा निर्माण करतो.”

“राज ठाकरे यांच्याकडून स्वस्तातील प्रसिद्धीसाठी टॅक्सीवाले, विद्यार्थी यांना मारहाण”

“राज ठाकरे यांनी स्वस्तातील प्रसिद्धीसाठी टॅक्सीवाले, विद्यार्थी यांना मारहाण केली. चित्रपट क्षेत्रातील लोकांना शिवीगाळ केली. राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर यूपी, बिहार, झारखंडच्या लोकांना शिवीगाळ करतात. राज ठाकरेंनी २००७ पासून २०२०-२१ पर्यंत योगी आदित्यनाथ यांना शिवीगाळ केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. आज त्या व्यक्तीचं ह्रदयपरिवर्तन झालंय. ते आज अयोध्येला येत आहेत,” असं ब्रिजभूषण सिंह यांनी सांगितलं.

“भगवान राम यांच्या वंशजांना मागील २० वर्षे सातत्याने मारहाण”

ब्रिजभूषण सिंह पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात राज ठाकरे अजानचा विरोध करू, अथवा हनुमान चालिसाचं पठण करो मला त्याच्याशी घेणंदेणं नाही. माझी भूमिका पक्षाची भूमिका नाही, माझी व्यक्तिगत भूमिका आहे. कारण मी उत्तर भारतीय आहे आणि उत्तर भारतीय म्हणून राज ठाकरे यांनी आमचा अपमान केलाय. भगवान राम यांना लहान नाही केलं पाहिजे, पण श्रीराम देखील उत्तर भारतीय होते. याच भगवान राम यांच्या वंशजांना मागील २० वर्षे सातत्याने ज्या व्यक्तीने मारहाण करण्याचं, अपमानित करण्याचं काम केलं त्यांनी यासाठी माफी मागावी. त्यांनी अयोध्येत येण्याला आमचा आक्षेप नाही.”

“आधी उत्तर भारतीयांसोबत जे केलं त्यासाठी माफी मागा”

“राज ठाकरे यांनी अयोध्येत यावं मात्र, आधी त्यांनी जे चुकीचं काम केलं, जे विष कालवून फूट पाडण्याचं काम केलं त्यासाठी माफी मागावी. यामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. माझ्याकडे त्यांची नावं आहेत. गरज लागल्यास ती यादी मी देईल. त्यामुळे राज ठाकरे यांनी अयोध्येच्या दौऱ्यावर येण्याआधी उत्तर भारतीयांसोबत जे केलं त्यासाठी खेद व्यक्त करा, माफी मागावी आणि अयोध्येत यावं,” असं मत ब्रिजभूषण सिंह यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “राज ठाकरेंनी हात जोडून माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही”; भाजपा खासदाराचा इशारा

“…तर मी राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशात घुसून देणार नाही”

“राजकारणासाठी माफी न मागता अयोध्येला येऊन दर्शन करून, फोटो काढून जाणार असाल, तर मात्र मी राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशात घुसून देणार नाही,” असा इशाराही भाजपा खासदार सिंह यांनी दिला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp up mp brijbhushan singh answer why he warn raj thackeray over ayodhya visit pbs

ताज्या बातम्या