Lal Krishna Advani Health Update Apollo Hospital: भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान, भारतरत्न लालकृष्ण अडवाणी (वय ९८) यांना छातीत संसर्ग झाल्याने शुक्रवारी संध्याकाळी नवी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते. अडवाणी यांना शुक्रवारी सायंकाळी ७:३० वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान शनिवारी सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयाने अडवाणी यांच्या प्रकृतीविषयीची माहिती दिली आहे. “अडवाणी यांना छातीच्या संसर्गामुळे अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये न्यूरोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे”, अशी माहिती इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयाने दिली.
वृद्धापकाळातील आजारांमुळे मे महिन्यात याच रुग्णालयात अडवाणी यांना दाखल करण्यात आले होते. बरे वाटू लागल्यानंतर काही दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच ७ ऑक्टोबर रोजी लालकृष्ण अडवाणी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली होती. सरकारचे प्रमुख म्हणून २५ वर्ष पूर्ण केल्याबद्दल त्यांनी अडवाणी यांचे आशीर्वाद घेतले होते. पंतप्रधान मोदी ७ ऑक्टोबर २००१ रोजी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर सलग २५ वर्ष ते सरकारचे प्रमुख म्हणून काम पाहत आले आहेत.
अडवाणी यांची भेट घेतल्यानंतर एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, अनेक दशके सार्वजनिक सेवा आणि राष्ट्रीय जीवनात योगदान देऊन त्यांनी आपला अमिट ठसा उमटवला आहे. भारताची प्रगती साधण्यात आणि देशाला बळकट करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
२०२४ मध्ये लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून लालकृष्ण अडवाणी हे राजकारणापासून अलिप्त आहेत. २२ जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. राम मंदिराच्या उभारणीसाठी अडवाणी यांनी मोलाचे योगदान दिले होते.
संघ स्वयंसेवक ते भाजपाच्या उभारणीत मोलाचे योगदान
भाजपाच्या यशामध्ये लालकृष्ण अडवाणींचा मोलाचा वाटा राहिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते भाजपाच्या वाटचालीमध्ये महत्त्वाची भूमिका असलेले नेते म्हणून लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे पाहिले जाते. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक ते देशाचे उपपंतप्रधान असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.
कराचीत जन्म, दिल्लीत राजकीय कारकिर्द
लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म पाकिस्तानच्या कराचीमध्ये ८ नोव्हेंबर १९२७ रोजी एका हिंदू सिंधी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव किशनचंद अडवाणी होते. अडवाणींचे प्राथमिक शिक्षण कराचीतील एका हायस्कूलमध्ये झाले. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही दिवस कराचीतील एका हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर १९४७ साली देशाची फाळणी झाली आणि त्यावेळी अडवाणी कुटुंबीय पाकिस्तान सोडून दिल्लीत आले.
दिल्लीत आल्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून स्वयंसेवक म्हणून आपल्या पुढील कारकिर्दीला सुरुवात केली आणि पुढे ते संघाचे प्रचारक झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत असतानाच १९५७ मध्ये अटलबिहारी वाजपेयी आणि नवनिर्वाचित खासदारांना मदत करण्यासाठी त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर ते जनसंघाच्या खासदारांना त्यांच्या संसदीय कार्यात मदत करू लागले. १९५८ ते १९६३ या दरम्यान त्यांनी दिल्ली प्रदेश जनसंघाचे सचिवपद भूषवले. १९६० मध्ये त्यांनी साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’मध्ये सहाय्यक संपादक म्हणूनही पदभार सांभाळला. त्यानंतर १९६७ मध्ये त्यांनी पूर्णवेळ राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला.
