भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालमध्ये बहुमत मिळवत मोठा विजय मिळवला आहे. ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाचा दारूण पराभव करून आता भाजपा पश्चिम बंगालमध्ये लवकरच सरकार स्थापन करणार आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांचा पराभव होऊन देखील त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं आहे. असं असतानाच बंगालमध्ये अनेक ठिकाणी भाजपा आणि टीएमसीचे कार्यकर्ते आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळालं आहे. अनेक ठिकाणी जाळपोळी सारख्या हिंसाचारांच्या घटना घडल्या आहेत.
तसेच भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री माध्यमग्राम या ठिकाणी घडली आहे. या घटनेनंतर पश्चिम बंगालमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आता पोलीस आरोपींचा शोध घेत असून पुढील कारवाई करत आहेत. मात्र, पश्चिम बंगालमधील अशा हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जतना पक्षाने एक निवेदन जारी करत टीएमसीला इशारा दिला आहे.
‘हिंसाचार, दहशत सहन केली जाणार नाही, तृणमूलच्या तथाकथित ‘गुंडा वाहिनी’च्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाईल’, असा इशारा भारतीय जनता पक्षाने निवेदन प्रसिद्ध करत दिला आहे.
भाजपाने काय प्रतिक्रिया दिली?
“आमच्या निदर्शनास आलं आहे की, तृणमूलच्या तथाकथित ‘गुंडा वाहिनी’चे काही घटक भाजपा कार्यकर्ते असल्याचं भासवून लोकांची दिशाभूल करण्याचा आणि गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे निःसंदिग्धपणे सांगितलं पाहिजे की, भाजपा अशी फसवणूक सहन करणार नाही. जो कोणी बनावट ओळख धारण करणं, धमकावणं किंवा कायदा हातात घेणं अशा प्रकारचं कृत्य करताना आढळून येईल त्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल”, असं भाजपाने म्हटलं आहे.
“या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटकांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. बंगालच्या जनतेने बदलासाठी निर्णायक कौल दिला आहे. गुन्हेगारी आणि शासनप्रणाली हातात हात घालून चालण्याचं युग आता संपलं आहे. आता येणारं सरकार कायद्याचं राज्य पुनर्संचयित करण्यासाठी, उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी आणि कोणत्याही भीतीशिवाय किंवा पक्षपाताशिवाय प्रत्येक नागरिकाचं संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध असेल. हिंसाचार, दहशत किंवा राजकीय बनावटगिरी अजिबात सहन केली जाणार नाही. कायदाच विजयी होईल”, अशी प्रतिक्रिया भाजपाने दिली आहे. याबाबत संदर्भात एक्सवर (ट्विटर) एक सविस्तर निवेदन सादर करण्यात आलं आहे.
