महाराष्ट्राच्या विकासासाठी कॉंग्रेस व्यतिरिक्त इतर सर्व पक्षांचा पाठिंबा घेण्यास आम्ही तयार आहोत, असे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी मंगळवारी स्पष्ट केले. रुडी यांच्या या वक्तव्यामुळे भाजप राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरच विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थिर सरकारसाठी राष्ट्रवादीने राज्यातील भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे.
निवडणुकीमध्ये सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे मतमोजणीनंतर शिवसेना आणि भाजप एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी, या दृष्टीने चर्चा सुरू झाली होती. मात्र, भाजपने सन्मानजनक प्रस्ताव न दिल्यामुळे या चर्चेला अंतिम रूप मिळाले नाही. त्यातच रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला देण्यात आलेले मंत्रिपद त्यांनी नाकारले आणि या सोहळ्यावर बहिष्कार टाकला. त्यानंतर या दोन्ही पक्षांमधील चर्चा बंद झाल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारला बुधवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जायचे आहे. त्याचवेळी रुडी यांनी कॉंग्रेसशिवाय आम्ही कोणाचाही पाठिंबा घेण्यास तयार असल्याचे सांगत राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यास भाजप तयार असल्याचे स्पष्ट केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी राष्ट्रवादीचा पाठिंबा भाजप घेणार का, असा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या उत्तरानंतरच भाजप सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. आता भाजप नेत्यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यास तयार असल्याचे सांगत शिवसेनेची आणखी कोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.