केंद्रातील एनडीए सरकारमधील त्रुटी शोधण्यापेक्षा काँग्रेसने राहुल गांधींचा शोध घ्यावा असा खरमरीत टोला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी लगावला. भारतीय जनता पक्ष (भाजप) पुढील दहा ते वीस वर्षे सत्तेत राहील असा दावा देखील  अमित शहा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केला. तसेच काँग्रेस पक्ष सध्या आपल्या चुका शोधण्यात मग्न असून पुढील काही वर्षे त्यांचा असाच प्रयत्न सुरू राहील, असेही ते पुढे म्हणाले.
भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक: अडवाणींच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत बंगळुरूमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. यामध्ये पक्षाचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. पुढील काळात पक्षातील समस्यांवर विचारमंथन केले जाईल आणि उत्तम प्रशासनाच्या बळावर भाजपची पुढील वाटचाल नक्कीच प्रगतीशील असेल, असा विश्वास यावेळी पक्षाचे सरचिटणीस पी. मुरलीधर राव यांनी व्यक्त केला. तसेच भूसंपादन विधेयकावर नक्कीच सविस्तर चर्चा होईल, विरोधकांनी या विधेयकाचा गैरप्रचार करून जनतेची दिशाभूल करण्याचा घाट घातला आहे. आम्ही जनतेत जाऊ आणि विधेयकाचे महत्त्व समजावून सांगू औद्योगिकीरण ही काळाची गरज आहे. विधेयकावरून उद्योग आणि शेती यामध्ये कोणताही विरोधाभास निर्माण होताना आम्हाला दिसत नाही, असे मुरलीधर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हणाले. सोबत विधेयकाबाबत विरोधकांशीही सल्लामसलत करण्याची तयारी असल्याचे नेतृत्त्वाने याआधीच स्पष्ट केल्याचेही ते पुढे म्हणाले.