भारतातील ज्या ठिकाणी मशिदी बांधण्यासाठी मंदिरे पाडली गेली आहेत, त्या सर्व ठिकाणी भाजपाकडून मंदिरे बांधली जातील,” असं वक्तव्य उत्तर प्रदेशमधील भाजपा आमदार संगीत सोम यांनी केलंय. सरधानाचे आमदार संगीत सोम हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. योगी सरकारचे साडेचार वर्ष पूर्ण झाल्यामुळे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सोम यांनी अखिलेश यादव हे हंगामी हिंदू असल्याचं म्हटलंय. तसेच सपा प्रमुखांमध्ये हिंमत असल्यास, मथुरेतील मंदिर पाडून तिथं मशीद बांधली गेली, असं बोलून दाखवण्याचं आव्हान सोम यांनी दिलं.

मथुरा मशीद आणि वाराणसीची ज्ञानवापी मशीद संघ परिवाराने बाबरी मशीद पाडण्यापूर्वीच्या वर्षांमध्ये फ्लॅशपॉईंट म्हणून ओळखली होती. दरम्यान, मुस्लिमांसह भारतातील प्रत्येकजण हा हिंदू आहे, असा दावाही सोम यांनी केला. ते म्हणाले, “अखिलेश यादव हंगामी हिंदू आहेत. ते इथं चालणार नाहीत, भारतात प्रत्येकजण हिंदू आहे, मुस्लिमही हिंदू आहे, हिंदूही हिंदू आहे आणि हिंदुस्थान हा हिंदूंचा आहे.”

सोम पुढे म्हणाले, “अखिलेश यादव सारखे लोक म्हणत आहेत की ते विश्वकर्मा मंदिर बांधतील, हे तेच लोक आहेत ज्यांनी राम भक्तांवर गोळीबार केला. ज्यांनी बनारसमध्ये साधूंवर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले? हे लोक आता हात जोडून माफी मागत आहेत. पण लोक त्यांना माफ करणार नाही.”

दरम्यान, उत्तर प्रदेसमध्ये सहा महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष तयारीला लागला असून एकमेकांवर टीका आणि आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. नुकतंच योगी आदित्यनाथ यांनी अब्बा जान म्हणत अखिलेश यादव आणि मुलायम सिंग यादव यांच्यावर टीका केली केली होती. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं.