भाजपाचा जाहीरनामा आज होणार प्रसिद्ध, अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता

पाच वर्षात मोदी सरकारने मिळवलेलं यश तसंच शेतकरी, व्यापारी, तरुण आणि रोजगारासंबंधी काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे

लोकसभा निवडणुकीआधी देशभरात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, मात्र अद्याप भाजपाने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ११ वाजता भाजपा आपला जाहीरनामा प्रसिद्ध कऱणार आहे. जाहीरनाम्यातून भाजपा मोठ्या घोषणा जाहीर करु शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. पाच वर्षात मोदी सरकारने मिळवलेलं यश तसंच शेतकरी, व्यापारी, तरुण आणि रोजगारासंबंधी काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध करु शकतात.

जाहीरनाम्यातून भाजपा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा, शेतकरी कल्याण, तरुण तसंच महिला सशक्तीकरणावर जास्त भर दिला जाईल. शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरु कऱण्यासाठी भाजपाला मोठ्या प्रमाणात सल्ले मिळाले आहेत.

पाच वर्षातील कामकाज आणि सरकारच्या यशासंबंधी देणार रिपोर्ट
गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात देशाने केलेली प्रगती आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सुरु कऱण्यात आलेल्या योजनांची माहिती भाजपा जाहीरनाम्यात देऊ शकतं. पीटीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जाहीरनाम्यात मुख्यत्वे शेतकऱ्यांवर जास्त लक्ष देण्यात आलं आहे. राष्ट्रीय सुरक्षेवर मोदी सरकारवर आपल्या धोरणांची माहिती देईल. जाहीरनाम्याच्या माध्यमातून मोदी सरकार पुन्हा एकदा देशवासियांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेसाठी आपण कटिबद्ध आणि प्राथमिकता असल्याचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसेल.

शेतकरी आणि रोजगाराच्या मुद्द्यांवर जोर
जाहीरनाम्यात शेतकरी आणि तरुणांशी संबंधित मुद्द्यांचा विशेष उल्लेख असेल. रोजगार निर्मितीसंबंधी धोरणांची माहिती यावेळी देण्यात येण्याची शक्यता आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनामम्यात गरिबांना वर्षाला ७२ हजार रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे. उत्तरादाखल भाजपा काँग्रेसच्या न्याय योजनेवर वरचढ ठरणारी योजना आणण्याची शक्यता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp will release manifesto for lok sabha election