नारायण राणे यांचा शिवसेनेला इशारा

नवी दिल्ली : बेळगाव महापालिका भाजपने ताब्यात घेतली, त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा पराभव करून भाजप सत्ता मिळवेल, बेळगावची पुनरावृत्ती मुंबई महापालिकेत दिसेल, असा दावा  भाजपचे नेते व केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वेगवेगळ्या निर्णयावर राणेंनी टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विनाकारण करोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती दाखवत आहेत. त्यांना घरात बसून काम करायचे असल्याने ते लोकांना घाबरवत आहेत.

राज्यात करोनामुळे १.३७ लाख लोकांचा मृत्यू झाला, पुरेसे डॉक्टर नाहीत, लस नाही अशी दुरवस्था झालेली आहे. आता हे सरकार करोनाच्या नावाखाली हिंदूंच्या सणांवर बंदी घालत आहे. पण, आम्ही सण साजरे करणार, असाही इशारा राणेंनी दिला.

चिपी विमानतळावरून वाद

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपळूण-पिरोळे (चिपी) विमानतळावरून ९ ऑक्टोबर रोजी नागरी विमानवाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती राणे यांनी दिली. राणे व शिंदे दिल्लीहून मुंबईला जातील व तिथून ते चिपी विमानतळावर पोहोचतील. मात्र, या विमानतळावरून ७ ऑक्टोबरपासून विमानसेवा सुरू होईल, असे ट्वीट शिवसेनेचे सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केल्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे.

विमानसेवा सुरू करण्याचे अधिकार केंद्राकडे असताना राज्य सरकार वा शिवसेना ही सेवा कशी सुरू करू शकते, असा सवाल राणे यांनी केला.

केंद्र सरकार राज्यांच्या अधिकारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. त्यावर, सीबीआय सज्जन व्यक्तींना त्रास देत नाही असा टोला राणेंनी लगावला.