पीटीआय, कोलकाता, गुवाहाटी
पश्चिम बंगालमध्ये नंदीग्राम आणि रेजिनगर या दोन मतदारसंघामध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने विजय नोंदवला. विशेष म्हणजे मुर्शिदाबाद जिल्ह्यातील मुस्लीमबहुल रेजिनगर मतदारसंघात मागील १५ वर्षे असलेले तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व त्यांनी मोडीत काढले. नंदीग्राम मतदारसंघातूनही भाजपच्या हसिरानी रथ यांनी काँग्रेसच्या मिलन प्रधान यांचा एक लाख २२ हजार मतांच्या विक्रमी फरकाने पराभव केला.

रथ या मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे दिवंगत स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या मातोश्री आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर चंद्रनाथ रथ यांची हत्या करण्यात आल्याने राजकीय खळबळ उडाली. त्यावेळी सुवेंदू अधिकारी नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र त्यांनी भवानीपूर येथील आमदारकी कायम ठेवली. पोटनिवडणुकीत डावी आघाडी, लोकशाही तृणमूल काँग्रेस, तृणमूल बंडखोर गटासह सर्वच उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.

दरम्यान, ७० टक्के मुस्लीम मतदारसंख्या असलेल्या रेजिनगरमध्ये भाजपचे शंखराव सरकार (१ लाख २९ ९१४) यांनी आम जनता उन्नयन पार्टीचे गोलाम नबी आझाद यांचा (५४ हजार ९८) यांना पराभूत केले. विधानसभा निवडणुकीत आझाद यांचे वडील हुमायून कबीर हे रेजिनगर येथून तब्बल ५८ हजार मतांच्या फरकाने निवडून आले होते. पण नौडा मतदारसंघातून विजयी झाल्याने त्यांनी रेजिनगर येथील आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे पक्षाने पोटनिवडणुकीसाठी त्यांचे चिरंजीव गोलाम नबी आझाद यांना उमेदवारी दिली होती. मात्र आझाद यांना पराभवाचा सामना करावा लागला.

तर आसाममधील नगाव लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवाशिष शर्मा यांनी ‘एआययूडीएफ’चे प्रमुख बद्रुद्दीन अजमल यांच्यावर विजयी आघाडी घेतली. तसेच तमिळनाडूच्या मदुरांतकम विधानसभा पोटनिवडणुकीत टीव्हीकेच्या मरगथम कुमारवेल यांनी विजयी आघाडी घेतली.

पुद्दुचेरीत ‘एआयएनआरसी’चा विजय

पुदुचेरीमधील पोटनिवडणुकीत सत्तारूढ अखिल भारतीय एन. रंगास्वामी काँग्रेसने (एआयएनआरसी) थत्तचावडी मतदारसंघातील वर्चस्व कायम ठेवले. एप्रिलमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांनी दोन जागांवर विजय नोंदवल्यानंतर थत्तचावडी येथील आमदारकीचा राजीनामा दिला होता. पोटनिवडणुकीत पक्षाचे अशोक आनंद (१३ हजार ३५८) यांनी काँग्रेसचे ई. विनयगम (४ हजार ८७६) यांचा पराभव केला. ‘एआयएनआरसी’ हा केंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष आहे.

आम्हाला सतत आशीर्वाद देणाऱ्या जनतेप्रति मी कृतज्ञ आहे. नगाव आणि नंदीग्राम तसेच रेजीनगरच्या निकालावरून हे दिसून येते की, जनतेचा आमच्या सुशासनाशी दृढ बंध आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान