नवी दिल्ली :  राज्याराज्यांत भगवा फडकवत निघालेल्या भाजपच्या विजयरथाने सोमवारी पश्चिम बंगालही पादाक्रांत केले. केंद्रातील २०१४च्या सत्तांतरानंतरही बंगाली अस्मितेच्या बळानिशी भाजपचा प्रतिकार करणाऱ्या ममता बॅनर्जींना राज्यातल्या जनतेनेच नाकारले तर, तमिळनाडूत द्रविडी राजकारणाभोवती ‘सत्ताखुर्ची’चा खेळ करणाऱ्या द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांना पछाडून अभिनेता विजय यांच्या ‘तमिलगा वेत्री कळघम’ने (टीव्हीके) नवा इतिहास रचला. केरळमध्ये डाव्यांना पदच्युत करत काँग्रेसने दक्षिणेतील आपले अस्तित्व बळकट केले. या तीन राज्यांत परिवर्तन घडत असताना आसाम आणि पुद्दुचेरीत मात्र सत्ताधीशांनीच सरशी साधली.

कमालीचे हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण, मतदारांच्या फेरतपासणीत वगळलेले तब्बल ९० लाख मतदार, महिलांच्या सुरक्षेवरून उठलेले वादळ आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे प्रशासन आणि कार्यकर्त्यांविरोधातील आक्रोश अशा अनेक कळीच्या मुद्द्यांनी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीतील भाजपचा विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या व्यूहरचनेचे यश मानले जात आहे. कधीकाळी ममतांच्या अत्यंत विश्वासू असलेले आणि आता भाजपचे नेते सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार ठरले आहेत.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये पश्चिम बंगालच लक्षवेधी ठरले नाही तर, तमिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांच्या ‘टीव्हीके’ पक्षाने पदार्पणातच सत्ता काबीज केली आहे. वर्षानुवर्षे ब्लॉकबस्टर तमिळ चित्रपट देणारे विजय थेट मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याची दाट शक्यता दिसू लागली असून तसे झाले तर ते तमिळनाडूचे ‘एनटीआर’ ठरतील. द्रविडी अस्मितेच्या जीवावर आलटून पालटून सत्ता मिळवणारे द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन्ही पक्षांवर मात करून ‘टीव्हीके’ने जबरदस्त धक्का दिला आहे.

उर्वरित आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यांत मात्र अपेक्षित निकाल लागले. आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आला असून आक्रमक हिंमत बिस्वा सर्मा यांची पुन्हा मुख्यमंत्री बनण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. केरळमध्ये सत्ताधारी ‘माकप’च्या ‘एलडीए’ आघाडीचा काँग्रेसच्या ‘यूडीएफ’ आघाडीने अपेक्षेप्रमाणे पराभव केला. ‘माकप’ नेते व पायउतार होणारे मुख्यमंत्री पी. विजयन यांचा सलग दहा वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला असे नव्हे तर देशात पहिल्यांदाच डावे पक्ष सत्तेपासून वंचित राहिले आहेत. पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात सलग दुसऱ्यांदा ‘एनडीए’ आघाडी सरकार बनवू शकेल.

बंगालचे भगवेकरण…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पश्चिम बंगालमध्ये मतदान होईपर्यंत तळ ठोकला होता. पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतरच शहांनी भाजपला पूर्ण बहुमत मिळेल इतकेच नव्हे तर पहिल्या टप्प्यातच ११० जागा मिळतील असे भाकीत केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पश्चिम बंगालमध्ये ‘खेला होबे’ असे म्हणत तृणमूल काँग्रेसच्या पराभवाचा दावा केला होता. पश्चिम बंगालमध्ये भाजपने दोनतृतीयांश जागा मिळवल्या असल्याने या राज्यात पहिल्यांदाच टोकाचे हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण झाल्याचे स्पष्ट झाले.

सुमारे ३० टक्के मुस्लीम मतदारांच्या एकगठ्ठा मतांचा फायदा यावेळी तृणमूल काँग्रेसला मिळाला नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुस्लीम मतेही तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, डावे पक्ष व हुमायून कबीर यांच्यासारख्या मुस्लीमप्रभुत्व पक्षांमध्ये विभागली गेली. पानीहाटीमध्ये आरजी कर रुग्णालयातील बलात्कार प्रकरणात बळी पडलेल्या मुलीची आई रत्ना देवनाथ यांनी भाजपच्या उमेदवार म्हणून तृणमूल काँग्रेसचा पराभव केला. त्यातूनच महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून महिला मतदारांनी ममता बॅनर्जींच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचे पाहायला मिळाले. पश्चिम बंगालमधील बदलाची लाट भाजपला अभूतपूर्व विजय मिळवून गेली. गेल्यावेळी नंदिग्राममध्ये सुवेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जींचा पराभव केला होता पण, भाजप पराभूत झाला होता. यावेळी भवानीपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी यांनी अधिकारी यांचा पराभव केला असला तरी राज्य गमवावे लागले आहे.

विजय नवा प्रादेशिक नेता!

तमिळनाडूमध्ये विजय यांच्या ‘टीव्हीके’च्या झंझावातात विद्यमान मुख्यमंत्री आणि सत्ताधारी ‘द्रमुक’चे प्रमुख स्टॅलिन यांनाच कोळाथूरमध्ये पराभवाचा धक्का बसला आहे. या मतदारसंघातून ते सलग तीन वेळा जिंकले होते. पण यावेळी ‘टीव्हीके’च्या व्ही. एस. बाबू यांनी स्टॅलिन यांचा पराभव केला. टीव्हीकेचे प्रमुख अभिनेते विजय तमिळनाडूमध्ये किंगमेकर ठरतील असे मानले जात होते. पण ते स्वतःच किंग बनले आहेत. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण पिढीने विजय यांना पसंती दिली. द्रमुक व अण्णाद्रमुक हे जुने पक्ष असून त्यांना आई-बाबा मते देतात अशी भावना ‘जेन-झी’ मतदार व्यक्त करत होते. शिवाय, महिलांच्या सुरक्षेचा मुद्दाही निर्णायक ठरल्याचे स्पष्ट झाले. पश्चिम बंगालप्रमाणे तमिळनाडूमध्येही सत्ताधारी ‘द्रमुक’च्या प्रशासनाविरोधातील रोष, नव्या पक्षाला संधी देण्याकडे मतदारांचा कल तसेच, महिलांचा विजयवरील विश्वास या मुद्द्यांसमोर उत्तर-दक्षिण वाद, हिंदी भाषावाद, द्राविडी अस्मिता हे ‘द्रमुक’चे प्रचाराचे मुद्दे फिके पडले. अभिनेते विजय यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली असून पेरम्बूर व तिरुचिरापल्ली (पूर्व) या दोन्ही मतदारसंघांतून विजय मिळवला आहे.

हिमंतांची हिंमत

आसाममध्ये मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांचा कथित वाचाळपणा आणि अरेरावीला धडा शिकवण्याची मोठी संधी काँग्रेसने गमावली. राहुल गांधी यांचे विश्वासू आणि काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले गेलेले गौरव गोगोई यांनाच जोरहाटमधून पराभव पत्करावा लागला. मुख्यमंत्री हिमंतांनी मात्र पारंपरिक जालुकबाडीमधून भरघोस मतांनी विजय मिळवला. आसाममध्ये झालेल्या मतदारसंघांच्या फेररचनेमुळे मुस्लीमबहुल मतदारसंघ कमी झाले. मुस्लिम मतदारांचे प्रभुत्वही कमी झाले. त्यामुळे एआययूडीएफचे बद्रुद्दीन अजमल यांच्यासारखे मुस्लीम नेते प्रभावहीन ठरले. हिमंतांनी केलेले ध्रुवीकरण आणि काँग्रेसमधून नेते बाहेर पडण्याची लाट या सगळ्याचा फटका काँग्रेसला बसला. इथेही भाजपने दोनतृतीयांश बहुमत मिळवून निवडणूक एकतर्फी झाल्याचे दाखवून दिले.

केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

सलग दहा वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहणारे ‘माकप’चे नेते पी. विजयन यांच्या विरोधात मतदारांनी कौल दिल्याचे स्पष्ट झाले. ख्रिश्चन मतदार डावी आघाडी, काँग्रेस आघाडी आणि भाजपमध्ये विभागल्यामुळे ही लढाई अटीतटीची होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण, काँग्रेसच्या ‘यूडीएफ’ आघाडीने १४० पैकी सुमारे १०० जागांपर्यंत मजल मारल्याने ही लढत एकतर्फी ठरली. या विजयामुळे दक्षिणेत कर्नाटक, तेलंगणा आणि केरळ या तीनही राज्यांमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली आहे. पुद्दुचेरीमध्ये विद्यमान मुख्यमंत्री एन. रंगस्वामी यांचा करिष्मा कायम असून त्यांच्या एनआर काँग्रेस आणि भाजप आघाडीने सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. यावेळी काँग्रेस व द्रमुक यांची आघाडी एनडीए आघाडीचा पराभव करेल असे मानले जात होते. पण, विरोधकांमधील अंतर्गत मतभेदामुळे सत्ताबदलाच्या शक्यता संपुष्टात आल्या.

द्रविडी राजकारणात नवा ‘विजय’

तमिळनाडूमध्ये विजय यांच्या ‘टीव्हीके’च्या झंझावातात मुख्यमंत्री आणि सत्ताधारी ‘द्रमुक’चे प्रमुख स्टॅलिन यांनाच कोळाथूरमध्ये पराभवाचा धक्का बसला आहे. टीव्हीकेचे प्रमुख अभिनेते विजय तमिळनाडूमध्ये किंगमेकर ठरतील असे मानले जात होते. पण ते स्वत:च किंग बनले आहेत. पहिल्यांदाच मतदान करणार्‍या तरुण पिढीने विजय यांना पसंती दिली. तमिळनाडूमध्येही सत्ताधारी ‘द्रमुक’च्या प्रशासनाविरोधातील रोष, नव्या पक्षाला संधी देण्याकडे कल तसेच, महिलांचा विजयवरील विश्वास या मुद्द्यांसमोर उत्तर-दक्षिण वाद, हिंदी भाषावाद, द्राविडी अस्मिता हे ‘द्रमुक’चे प्रचाराचे मुद्दे फिके पडले. विजय यांनी पेरम्बूर व तिरुचिरापल्ली (पूर्व) या दोन्ही मतदारसंघांतून विजय मिळवला आहे. त्यांच्या पक्षाला १०७ जागा मिळाल्या असून,  सरकार स्थापनेसाठी छोट्या पक्षांना बरोबर घ्यावे लागेल असे चित्र आहे.

दोन मुख्यमंत्री पराभूत

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भवानीपूर मतदारसंघातून पराभूत झाल्या. सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा १५,१०५ मतांनी पराभव केला. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलीन कोळाथूरमध्ये टीव्हीकेच्या व्ही.एस.बाबू यांच्याकडून पराभूत झाले.