पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी एका ६३ वर्षीय वृद्ध व्यक्तीने चालत तब्बल ७०० किमी अंतर कापलं आहे. भाजपा कार्यकर्ता असणारी ही व्यक्ती मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील आहे. मोदींची भेट घेण्यासाठी त्यांनी मध्य प्रदेश ते दिल्ली असा ७०० किमी पायी प्रवास केला. मोदींची भेट घेतल्यानंतर त्यांनी अनुसूचित जातीमधील लोकांना होणारा त्रास तसंच बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला.

छोटेलाल अहिरवार यांनी मोदींकडे आपल्या मागण्याचं एक पत्र सोपवलं आहे. यामध्ये खासकरुन त्यांनी रोजगाराचा मुद्दा मांडला आहे. रोजगार निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त उद्योग आपल्या भागात आणावेत अशी विनंती त्यांनी केली.

छोटेलाल तब्बल २२ दिवस चालत होते. देवरी येथून प्रवास सुरु केल्यानंतर ११ ऑक्टोबरला ते राजधानी दिल्लीत दाखल झाले. यानंतर ते सेलिब्रिटी झाले असून मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासापून ते भाजपाचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल सर्वजण त्यांची चर्चा करत आहेत.

१४ ऑक्टोरला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर छोटेलाल दुसऱ्या दिवशी ट्रेनने सागरला परतले. “छोटेलाल यांच्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीची वेळ मिळेपर्यंत मी त्यांना माझ्या घऱात थांबण्यास सांगितलं होतं,” अशी माहिती प्रल्हाद पटेल यांनी दिली आहे.

छोटेलाल यांनी यावेळी पंतप्रधानांना रस्त्यात चोरांनी त्यांना लुटण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली. पण माझ्याकडे काहीच नसल्याने त्यांचा भ्रमनिरास झाल्याचं ते मीडियाशी बोलताना म्हणाले.

मोदींना मला मिठी मारली –

छोटेलाल यांनी सांगितलं की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला मिठी मारली. तसंच सरकारने गरिबांसाठी सुरु केलेल्या योजनांची माहिती दिली”. दरम्यान मोदींनी यावेली त्यांना भेटण्यासाठी पायी येण्याची काय गरज होती असं विचारलं. यावर छोटेलाल यांनी पायी आलो नसतो तर कदाचित भेट झाली नसती असं म्हटलं. मोदींना भेटतान छोटेलाल यांनी भाजपाचा झेंड्याचे कपडे परिधान केले होते.