BK Hariprasad Mysuru speech voter list: कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर टीका केली. “जनावरांना मारणारे तुरुंगात जात आहेत आणि माणसं मारणारे पंतप्रधान, मुख्यमंत्री होत आहेत”, असे वक्तव्य हरिप्रसाद यांनी केले. मतदार याद्यांची विशेष फेरतपासणीबाबत म्हैसूर येथे जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना हरिप्रसाद यांनी हे वक्तव्य केले.

काय म्हणाले हरिप्रसाद?

“आपण आता आशा वळणावर आलो आहोत की, आपल्याला महात्मा गांधींचे राजकारण स्वीकारायचे आहे की, त्यांची हत्या करणाऱ्या गोडसेचे हे ठरवावे लागेल. आपण सगळेच राजकारण करतो आणि मी हे नाकारत नाही. राजकारण करणे ही एक बाब आहे, पण धार्मिक राजकारण करणाऱ्यांपासून आपण सावध असायला हवं. सध्या देशात अशी परिस्थिती आहे की, जी लोकं जनावरं मारतात त्यांना तुरुंगवास होतो आणि जी लोकं माणसं मारतात ते पंतप्रधान आणि मुख्यमंत्री होतात. सच्चा काँग्रेसी या गोष्टी होऊ देणार नाही”, असे हरिप्रसाद कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले.

भाजपा, आरएसएसवर टीकास्त्र

हरिप्रसाद यांनी यावेळी भाजपा आणि आरएसएसवर टीका करताना दोघांचा संविधानावर विश्वास नसल्याचा आरोप केला. मतदार यादी फेरतपासणीचा राजकीय फायद्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोपही हरिप्रसाद यांनी केला. “भाजपा आणि आरएसएसचा संविधानावर विश्वास नाही. त्यांना तिरंग्यासाठी आदर नाही. सर्वधर्म समभाव यांच्या विरोधात ते आहेत. स्वत:च्या फायद्यासाठी ते मतदार याद्यांची फेरतपासणी करत आहेत, कोणाची नावे ठेवायची याचा निर्णय ते घेत आहेत”, असा आरोप हरिप्रसाद यांनी केला.

मतदार यादी विशेष फेरतपासणी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

मतदार याद्यांच्या फेरतपासणी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन हरिप्रसाद यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केले. “या कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे. घरोघरी जाऊन तपासणी सुरु होईल त्यावेळी आपल्या बीएओ आणि इतर कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याची गरज आहे. उत्पन्नाचा अर्ज आणि इतर माहिती व्यवस्थित भरली जात आहे का? याची तपासणी करावी”, असे आवाहन हरिप्रसाद यांनी कार्यकर्त्यांना केलं.