RSS Jaish Taliban Comparison: कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि तालिबानशी तुलना केली. हरिप्रसाद यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना आरएसएसवर देशभक्ती आणि कायदेशीर नोंदणीवरुन टीका केली आहे. आरएसएस, जैश-ए-मोहम्मद आणि तालिबान यांच्यात काही फरक नाही कारण तिन्ही भारतात नोंदणीकृत नाहीत, असे हरिप्रसाद म्हणाले.

काँग्रेसच्या हरिप्रसाद यांची आरएसएसवर टीका

हरिप्रसाद यांनी वन्दे मातरमवरुन यावेळी मोहनन कुन्नुमल यांच्यावर देखील टीका केली. “आरएसएसमध्ये वन्दे मातरम गायिले जात नाही तसेच ते राष्ट्रगीत देखील गात नाहीत किंवा तिरंगा देखील फडकवत नाहीत”, असे हरिप्रसाद म्हणाले. वन्दे मातरमवरुन ज्येष्ठ काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरएसएसच्या नोंदणीबाबत काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी विविध प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आता हरिप्रसाद यांनी आरएसएसवर टीका केली आहे.

बी. एल संतोष काय म्हणाले होते?

प्रियांक खरगे यांनी आरएसएसच्या नोंदणीचा मुद्दा उपस्थित करत कोणत्या भारतीय कायद्याखाली त्यांच्या मालमत्ता नोंदणीकृत आहेत? बँक खाती आणि देणगी स्वीकारण्याबाबत सवाल उपस्थित केला होता. यावर स्पष्टीकरण देताना भाजपाचे राष्ट्रीय सचिव बी. एल संतोष यांनी संघाला नोंदणीची गरज नसल्याचे वक्तव्य केले होते. आरएसएस १९२५ पासून कार्यरत असून, संघाला नोंदणीची गरज नाही. संघ नागरिकांच्या विश्वासावर कार्यरत असल्याचे संतोष म्हणाले होते.

प्रियांक खरगेंचे पाच प्रश्न

संघाला कागदपत्रांची गरज नाही. विभाजन झाले त्या काळात संघ देशाबरोबर उभा होता याशिवाय विविध संघर्षात संघाने नोंदणीशिवाय काम केलं आहे. दरम्यान, प्रियांक खरगे यांनी यावरुन टीका करताना आरएसएसला पाच प्रश्न विचारले. आरएसएस कोणत्या कायद्याखाली नोंदणीकृत आहे? देशभरात असणाऱ्या मालमत्तांची मालकी कोणाकडे आहे? बँक खाती कोणाच्या नावाने आहेत? देणगीचे पैसे कोणाकडे येतात? खात्यांची ऑडीट आणि कर भरल्याचे तपशील कुठे आहेत? असे प्रश्न प्रियांक खरगेंनी उपस्थित केले.