BLA Attack Pakistan Coast Guard: बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) पाकिस्तानी सुरक्षा दलांवर केलेल्या सागरी हल्ल्यात तीन जवान ठार झाले आहेत. बलुचिस्तानमधील जिवानी या किनारपट्टीच्या शहराजवळ बीएलएने पाकिस्तान तटरक्षक दलाच्या गस्ती बोटीवर हल्ला केला. अरबी समुद्रात पाकिस्तान तटरक्षक दलाची बोट गस्त घालत असताना बलुच बंडखोरांनी हल्ला करत तीन जवानांना ठार केल्याचा दावा बीएलएने केला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.

तीन पाकिस्तानी जवान ठार

पाकिस्तानमधील बलुचिस्तान पोस्ट या वृत्तवाहिनीने याबाबत एक वृत्त प्रसिद्ध केले आहे. पाकिस्तान आणि इराणला जोडणाऱ्या समुद्री सीमेवर गस्त घालत असताना बलुच बंडखोरांनी पाकिस्तान तटरक्षक दलाच्या जवानांवर बेछूट गोळीबार केला. यात तीन पाकिस्तानी जवान ठार झाल्याचे या वृत्तात म्हटले आहे. ‘तटरक्षक दलाच्या जवान समुद्री सीमेवर गस्त घालत असताना बलुच बंडखोरांनी गोळीबार केला’, असे पाकिस्तान गुप्तचर संस्था आणि पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, बलुच बंडखोरांनी केलेल्या या हल्ल्यात तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. यात नाईक अफजल, शिपाई जमील आणि शिपाई उमर यांचा समावेश आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये बलुच आर्मीचे काहीजण बोटीत बसून पाकिस्तानी जवानांवर गोळ्या झाडत असल्याचे दिसत आहे. तर पाकिस्तानी बोटीत असणारे जवान बचाव करण्यासाठी पाण्यात उडी घेताना दिसत आहेत पण, त्यांचा या गोळीबारात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बलुच आर्मीचा इशारा

जिवानी येथे पाकिस्तानी गस्त बोटीवर हल्ला केल्याचे स्पष्टीकरण बलुच लिबरेशन आर्मीच्या वतीने देण्यात आले आहे. बलुच आर्मीने आता समुद्रात देखील कारवाईची व्याप्ती वाढवली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जमिनीसह आता समुद्र मार्गातून देखील हल्ला आणि घुसखोरी करण्याचा इशाराच बलुच आर्मीने दिला आहे. दरम्यान, हा हल्ला ग्वादार बंदारच्या जवळच झाल्याने पाकिस्तानसाठी ही डोकेदुखी ठरणार आहे. चीन आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या करारात ग्वादार बंदराचे मोठे महत्व आहे. पण, बलुच बंडखोरांच्या हा हल्ला पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.