मलेशियाई विमान कंपनीच्या ‘एनएच-१७’ या विमान अपघातास त्यावर आदळलेले रॉकेट हेच कारण असल्याचे या विमानाच्या ‘ब्लॅक बॉक्स’च्या पृथक्करणावरून निष्पन्न झाले आहे.
मलेशियाच्या या विमानाला झालेल्या अपघातात आतील १९३ प्रवासी व ५ कर्मचारी असे १९८ जण ठार झाले होते. युक्रेनमधील रशियाधार्जिण्या बंडखोरांनी हे विमान पाडल्याचा दावा केला जात आहे. तो दावा खरा असल्याचा निष्कर्ष या विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील माहितीचे विश्लेषण केल्यानंतर निघत आहे. विमानावर रॉकेट जोरदार आदळल्याने तसेच त्यानंतर त्याचे तुकडे विमानात घुसल्याने हा अपघात झाल्याचे संकेत या विमान अपघाताच्या चौकशीसाठी तैनात करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय तपास पथकाने दिले आहेत.
या ब्लॅक बॉक्समधील फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील माहितीचे विश्लेषण ब्रिटनमध्ये करण्यात आले. त्यातून ही माहिती उघड झाली आहे.
दरम्यान, या घातपाताची चौकशी करणाऱ्या हॉलंडच्या तपासपथकाने या माहितीस दुजोरा देण्यास नकार दिला. नेमके काय झाले याचा पक्का अंदाज आल्याशिवाय स्पष्टपणे काहीही सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रिया या तपासपथकाद्वारे देण्यात आली. अपघातानंतर विमानाचे अवशेष ज्या भागात पडले त्या परिसरात जाऊन तपास करण्याचा या पथकाचा प्रयत्न आहे. मात्र या परिसरातील तुंबळ युद्धामुळे या पथकाला अपघातस्थळाच्या जवळपासही जाता आले नाही.  या विमानात नेदरलँड्सचे १९३ नागरिक होते ते मारले गेले. तेथेही हे विमान पाडण्यात आल्याबाबत चौकशी करण्यात येत असून तेथील तपासकर्त्यांनी मात्र नेमके कशामुळे विमान पडले हे सांगण्यास नकार दिला.
 या परिसरात जोरदार धुमश्चक्री सुरू असल्याचे युक्रेनच्या लष्करातर्फेही सांगण्यात आले.रॉकेटच्या स्फोटातील अणकुचीदार वस्तूंच्या आघाताने पडले असे दिसून आले आहे, असे युक्रेनच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.