अयोध्येत तणाव! उद्धव ठाकरेंना दाखवणार काळे झेंडे

भव्य राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी येत्या २५ नोव्हेंबरला शिवसेनेसह अन्य हिंदुत्ववादी संघटना अयोध्येमध्ये एकत्र येणार आहेत.

छायाचित्र : सचिन देशमाने

भव्य राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी येत्या २५ नोव्हेंबरला शिवसेनेसह अन्य हिंदुत्ववादी संघटना अयोध्येमध्ये एकत्र येणार आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये तणाव वाढत चालला असून व्यापारी वर्गाच्या मनात भितीची भावना आहे. विश्व हिंदू परिषदेने गुरुवारी मनाई हुकुम झुगारुन देत रविवारी होणाऱ्या धर्म सभेला पाठिंबा मिळवण्यासाठी अयोध्येमध्ये रोड शो केला.

अयोध्येमध्ये यापूर्वी घडलेल्या घटना आणि राम मंदिर मुद्द्याची संवेदनशीलता लक्षात घेऊन अयोध्येत कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अयोध्येला एक किल्ल्याचे स्वरुप आले आहे. संपूर्ण शहरात सीआरपीएफ, पीएसी आणि पोलिसांच्या तुकडय़ा तैनात आहेत. वादग्रस्त जागेवर सद्य स्थिती कायम रहावी. कुठल्याही प्रकारचे उल्लंघन होऊ नये असे स्पष्ट आदेश आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

रामजन्मभूमी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेकांना आजही ६ डिसेंबर १९९२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भिती वाटत आहे. अयोध्येतील व्यापाऱ्यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. फैजाबादच्या संयुक्त व्यापार मंडळाने विश्व हिंदू परिषदेच्या धर्म सभेला विरोध केला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

ही मंडळी अयोध्या आणि फैजाबादमधील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत असे व्यापार मंडळाचे अध्यक्ष जनार्दन पांडे म्हणाले. अयोध्येमध्ये कलम १४४ लागू असतानाही विहिपने रोड शो केला. बजरंग दलाचे कार्यकर्ते यामध्ये होते. राम लल्ला हम आये हैं, मंदिर वही बनायेंगे अशी घोषणाबाजी त्यांनी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Black flag will show to uddhav thackray in ayodhya

ताज्या बातम्या