पानिपत : वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसने ‘काळी वस्त्रे’ परिधान करून आंदोलन केले होते. या आंदोलनाचे वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काळी जादू’ असे केले आहे. काँग्रेसने कितीही ‘काळी जादू’ करण्याचा प्रयत्न केला तरी जनतेच्या मनात ते विश्वास निर्माण करू शकत नाही, अशी टीका पंतप्रधानांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पानिपत येथील एका कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. काही जण सध्या खूप नैराश्यात आहेत. नैराश्य दूर करण्यासाठी ५ ऑगस्ट रोजी त्यांनी ‘काळी जादू’ केली, असे पंतप्रधान म्हणाले. त्यास ५ ऑगस्ट रोजी काँग्रेसने काळी वस्त्रे परिधान करून केलेल्या आंदोलनाचा संदर्भ होता. ‘‘काही लोकांनी ५ ऑगस्ट रोजी ‘काळी जादू’ करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना वाटते की काळी वस्त्रे परिधान केली तर आपल्या सर्व समस्या सुटतील, नैराश्य दूर होईल. पण जादूटोणा, काळी जादू यांसारख्या अंधश्रद्धेत गुंतून ते जनतेचा विश्वास मिळवू शकत नाही,’’ असे नरेंद्र मोदी म्हणाले. ‘‘सध्या तुमचे वाईट दिवस चालू आहेत. पण काळी जादू केल्याने तुमचे वाईट दिवस संपणार नाही, हे लक्षात असू द्या,’’ अशी टीकाही त्यांनी केली.

आम आदमी पक्षाच्या ‘मोफत’ धोरणाचाही पंतप्रधानांनी समाचार घेतला. जे मोफत देण्याचे वचन देतात, त्यांना नवीन तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्यासाठी संसाधने कधीच सापडणार नाहीत, असे ते म्हणाले. ‘‘ मोफत धोरण योग्य नसून दिशाभूल करणारे आहे.  ते राष्ट्रहिताचे नाही तर राष्ट्राच्या विरोधात आहे. मोफत धोरणामुळे नवी गुंतवणूक होणार नसून हे धोरण राष्ट्राला मागे ढकलणारे आहे, अशी टीका पंतप्रधानांनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Black magic will not help win trust of people pm narendra modi attacks congress zws
First published on: 11-08-2022 at 03:16 IST