scorecardresearch

‘निवडणुकीतील अपयशासाठी केवळ राहुल यांना जबाबदार धरणे चुकीचे’

नवी दिल्ली : गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा देताना शुक्रवारी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या दारूण पराभवास काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जबाबदार धरले. त्यावर टीका करताना काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी म्हटले आहे की, माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य करून त्यांचा व्यक्तिगत अपमान आझाद यांनी केला आहे. निवडणुकीतील अपयशासाठी एकाच […]

‘निवडणुकीतील अपयशासाठी केवळ राहुल यांना जबाबदार धरणे चुकीचे’
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी

नवी दिल्ली : गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा देताना शुक्रवारी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या दारूण पराभवास काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जबाबदार धरले. त्यावर टीका करताना काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी म्हटले आहे की, माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य करून त्यांचा व्यक्तिगत अपमान आझाद यांनी केला आहे. निवडणुकीतील अपयशासाठी एकाच व्यक्तीला जबाबदार धरणे चुकीचे आहे. 

पायलट म्हणाले, की आझाद यांनी राजीनामा देण्यासाठी निवडलेली वेळही अत्यंत दुर्दैवी आहे. भाजपच्या कुशासनाविरुद्ध काँग्रेस सर्व स्तरांवर मोहीम सुरू करण्याच्या तयारीत असताना त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. असे करून आझाद यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने आपल्यावरील जबाबदारी पार पाडलेली नाही. गेल्या ५० वर्षांपेक्षा जास्त काळ आझाद यांनी विविध पदे भूषवली. मात्र, ज्या वेळी देशासह पक्षाला जनतेसाठी आवाज उठवण्याची त्यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे, तेव्हा त्यांनी साथ सोडली.

राहुल गांधी यांनी २०१३ मध्ये तत्कालीन पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारचा अध्यादेश प्रसारमाध्यमांसमोर जाहीररीत्या फाडला, त्यामुळे २०१४ मधील निवडणुकीत काँग्रेसला पराभवास तोंड द्यावे लागले, या आझाद यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना पायलट म्हणाले, की एखाद्या व्यक्तीवर सर्व दोष लादणे अत्यंत चुकीचे आहे. आझाद यांच्यासह आम्ही या सरकारचे घटक होतो. त्यामुळे २०१४ च्या पराभवासाठी एकाच व्यक्तीला लक्ष्य करणे बरोबर नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Blame only rahul gandhi for election failure is wrong says sachin pilot zws