पीटीआय, नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील बाबिना येथे रणगाडय़ांच्या तोफा डागण्याच्या सरावादरम्यान (फील्ड फायरिंग) सराव एका ‘टी-९०’ रणगाडय़ाची तोफ स्फोटात फुटल्याने लष्कराच्या दोन जवानांचा मृत्यू झाला. या घटनेत एक जवान जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. गुरुवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली.

एका अधिकाऱ्याने सांगितले, की ‘बबिना फील्ड फायरिंग रेंज’ येथे ६ ऑक्टोबर रोजी झालेल्या रणगाडय़ांच्या तोफा डागण्याच्या वार्षिक सरावादरम्यान, एका रणगाडय़ाच्या तोफेचा स्फोट झाला. या रणगाडय़ात तीन लष्करी जवानांचे पथक होते. तिन्ही जखमींना तातडीने उपचारासाठी बाबिना येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, पथक प्रमुख (कमांडर) आणि तोफ संचालक (गनर) गंभीरित्या भाजल्यामुळे मृत्युमुखी पडले. रणगाडाचालकावर उपचार सुरू असून, त्याच्या प्रकृतीला आता धोका नाही. कमांडर ‘ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर’ असल्याचे समजते.

चौकशीचे आदेश

एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले, की दुर्घटनेत प्राण गमावलेल्या सैनिकांच्या शोकाकुल कुटुंबांप्रती भारतीय लष्कर आपल्या संवेदना व्यक्त करते. लष्कराने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.