नवी दिल्ली : राज्यात महायुतीमध्ये प्रामुख्याने शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असली तरी, महानगर मुंबई परिसरातील (एमएमआरडीए) महापालिकांच्या निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशिवाय पर्याय नाही, हे स्पष्ट झाल्यामुळे शिंदे गटाला धक्का न लावण्याचे धोरण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अवलंबल्याचा दावा या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी केला. शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यामुळे संतापलेल्या एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती.
महापालिका निवडणुका महायुती एकत्रित लढणार असेल तर नेत्यांची पळवापळवी का केली जात आहे, असा सवाल शिंदेंनी केला होता. त्यांच्या आरोपाचा रोख प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर मात्र शिंदे गटातील नेत्यांच्या फोडाफोडीला विराम लावण्यात आला आहे. महापालिका निवडणुकांमध्ये शिंदे गटाची ताकद उपयुक्त ठरेल, असे भाजपच्या केंद्रीय नेत्यांना वाटत असल्याने शिंदे गटाला सांभाळून घेतले जाईल, असा दावा वरिष्ठ नेत्याने केला.
मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेना-ठाकरे गटाकडून हिसकावून घेण्याला भाजपने प्राधान्य दिले असून शिंदे गटाच्या मदतीशिवाय ही कामगिरी फत्ते होऊ शकत नाही, असे भाजपच्या केंद्रातील नेत्यांचे म्हणणे आहे. मुंबईमध्ये ठाकरे गटाची ताकद कमी करण्यासाठी शिंदे गटाची गरज आहे. यंदाच्या महापालिकेच्या निवडणुकीत शिंदे गट भाजपला किती उपयुक्त ठरतो यावर शिंदे गटाचे भवितव्य ठरेल, असा दावा भाजपच्या नेत्यांनी केला.
ठाकरे बंधूंच्या एकीचा परिणाम नाही
मुंबई महापालिका निवडणूक होईपर्यंत तरी शिंदे गटाबाबत भाजपकडून सबुरी बाळगली जाईल. शिवसेना ठाकरे गट व राज ठाकरे यांची मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र आले तरी, भाजपचे फार नुकसान होण्याची शक्यता नाही. ठाकरे बंधू मराठी मते रोखू शकत नाहीत, शिंदे गटाला मराठी मते मिळणारच. म्हणूनच शिंदे गट महापालिका निवडणुकीत कळीचा ठरतो, असे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे म्हणणे आहे.
शिंदे गट मूळ शिवसेनेतून बाहेर पडला असला तरी, मुंबईमध्ये ठाकरे गटाची ताकद टिकून राहिलेली आहे. पूर्वीपासून शिवसेनेचे कार्यकर्तेच रस्त्यावर उतरत असत, गरज पडेल तेव्हा लोकांच्या मदतीला धावून येत असत. ही स्थिती अजूनही कायम आहे. त्यामुळे शिंदे गटाला मुंबईतील शिवसेना- ठाकरे गटाची संघटना ताब्यात घेण्यासाठी कष्ट करावे लागतील, असा युक्तिवाद शहांच्या विश्वासू नेत्यांकडून केला जात आहे.
महायुतीच्या सरकारमधील सत्तास्पर्धा तीव्र होऊ लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबोला धरल्याचे सांगितले जाते. शिंदेंच्या वारंवार होणाऱ्या दिल्लीवारीमुळेही मतभेद तीव्र झाल्याचे मानले जात आहे. मात्र, या चर्चा दोघांनीही फेटाळल्या आहेत. महापालिका निवडणुका होईपर्यंत तरी शिंदेंशी जुळवून घेण्याशिवाय प्रदेश भाजपच्या नेत्यांना पर्याय नसल्याचे भाजपच्या केंद्रीय नेत्याने सूचित केले.
जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही
* सरकारमधील सत्तास्पर्धा तीव्र होऊ लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबोला धरल्याचे सांगितले जाते. शिंदेंच्या वारंवार होणाऱ्या दिल्लीवारीमुळेही मतभेद तीव्र झाल्याचे मानले जात आहे. मात्र, या चर्चा दोघांनीही फेटाळल्या आहेत.
* महापालिका निवडणुका होईपर्यंत तरी शिंदेंशी जुळवून घेण्याशिवाय प्रदेश भाजपच्या नेत्यांना पर्याय नसल्याचे भाजपच्या केंद्रीय नेत्याने सूचित केले.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदी- भुसे
नंदुरबार : जनतेला तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण, असे विचारले तर जनता एकनाथ शिंदे यांचे नाव घेईल. भविष्यात महाराष्ट्राचे नेतृत्व एकनाथ शिंदेच करतील, असा विश्वास शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नंदुरबारमधील प्रचारसभेत व्यक्त केला. एकनाथ शिंदे यांच्यासारखा अद्वितीय मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार देखील महाराष्ट्रात इतक्या स्वाक्षरी करणारा मुख्यमंत्री आपण पाहिलेला नाही, असे कौतुक करतात, असे दादा भुसे म्हणाले.
