बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनल पार्टीने (BNP) शुक्रवारी मोठा विजय मिळवला आहे. या विजयानंतर बीएनपीने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर खटला चालवता यावा यासाठी त्यांच्या भारतातून प्रत्यार्पणाची पुन्हा एकदा मागणी केली आहे.

बांगलादेशमध्ये बीएनपीच्या (BNP) दणदणीत विजयानंतर काही वेळातच पक्षाच्या स्थायी समितीचे सदस्य सलाउद्दीन अहमद म्हणाले की, त्यांचा पक्ष अधिकृतपणे शेख हसीना यांच्यावर खटला चालवण्यासाठी त्यांना बांगलादेशाकडे प्रत्यार्पित करावे अशी विनंती भारताकडे करेल.

“परराष्ट्र मंत्र्यांनी यापूर्वीच त्यांच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा मांडला आहे, आणि आम्ही त्याला पाठिंबा देतो,” असे बीएनपी नेते सलाउद्दीन अहमद म्हणाले, असे वृ्त्त पीटीआयने दिले आहे.

“आम्ही कायद्यानुसार त्यांच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा सातत्याने लावून धरला आहे. हा दोन देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमधील विषय आहे. आम्ही भारत सरकारकडेही खटला चालवण्यासाठी त्यांना (शेख हसीना) बांगलादेशात परत पाठवावे अशी विनंती देखील केली आहे,” असेही ते म्हणाले.

बांगलादेशाला भारतासह शेजारच्या सर्व देशांबरोबर सामान्य संबंध हवे आहेत असे अहमद म्हणाले. मात्र त्यांनी यावेळी हे संबंध समानतेवर आधारित असले पाहिजेत यावर भर दिला. “आम्हाला भारतासह सर्व देशांबरोबर परस्पर आदर आणि बरोबरीचा दर्जा याच्या आधारावर उभारलेले मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत,” असे ते म्हणाले.

शेख हसीना यांनी १२ फेब्रुवारी रोजी बांगलादेशात पार पडलेल्या निवडणुका हे एक ‘ढोंग’ म्हटले होते. त्यानंतर बीएनपीकडून ही मागणी करण्यात आली आहे.

शेख हसीना कुठे आहेत?

बांगलादेशमध्ये झालेल्या निवडणुकीत बीएनपीने दणदणीत विजय मिळवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पक्षाकडून हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी करण्यात आली आहे. ऑगस्ट २०२४ मधील आंदोलनानंतर हसीना यांना पद सोडावे लागले होते, त्यानंतर झालेली ही पहिलीच राष्ट्रीय निवडणूक आहे.

पदावरून हटवले गेल्यानंतर हसीना या नवी दिल्ली येथे राहत आहेत. हसीना यांना २०२४ मधील हिंसाचार आणि आंदोलनादरम्यान केलेल्या क्रूर कारवाईशी संबंधित विविध आरोपाखाली नोव्हेंबर २०२५ मध्ये एका स्पेशल ट्रिब्युनलने फाशीची शिक्षा सुनावली होती.
पद गेल्यापासून हसीना या सार्वजनिक जीवनातून दूर गेल्या आहेत. त्या क्वचित कधीतरी एखादे वक्तव्य करत असतात.