गेल्या काही महिन्यांपासून अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेली राजकीय आणि आर्थिक अशांतता, सुदान, इराक किंवा इतर आखाती देशांमधील ढासळती आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती या पार्श्वभूमीवर ब्रिटन आणि फ्रान्स या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या स्थलांतर होत आहे. या दोन्ही देशांकडून सातत्याने हे स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न होत असतानाही हे स्थलांतर सुरूच आहे. विशेषत: गेल्या महिन्याभरात या स्थलांतरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे ब्रिटन आणि फ्रान्स या देशांमध्ये समुद्री मार्गाने जाण्यासाठी असलेल्या इंग्लिश खाडीमधून स्थलांतरीतांच्या वाहतुकीचं प्रमाण वाढलं आहे.

बुधवारी अशीच एक बोट इंग्लिश खाडीमधून पार होत असताना बुडाल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बोटीमध्ये एकूण ३३ जण प्रवास करत होते. त्यापैकी ३१ जणांचा मृत्यू झाला असून २ जण अद्याप बेपत्ता आहेत. ही बोट बुडाल्याची माहिती मिळताच ब्रिटन आणि फ्रान्स या दोन्ही देशातील सागरी व्यवस्थापनाने संयुक्तपणे स्थलांतरीतांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली. मात्र, त्यात त्यांना यश मिळू शकलं नाही.

दरम्यान, फ्रान्स आणि ब्रिटन या दोघांनी संयुक्तपणे शोधमोहीम जरी हाती घेतली असली, तरी अशा प्रकारच्या स्थलांतरासाठी दोन्ही देश एकमेकांना दोष देताना दिसत आहेत. हे स्थलांतर रोखण्यासाठी पुरेसे प्रयत्न करत नसल्याचा आरोप दोन्ही देश एकमेकांवर करत आहेत.