ओदिशातील संबळपूर जिल्हय़ात बोट बुडून मरण पावलेल्यांची संख्या आता २४ झाली आहे. आणखी १३ मृतदेह सोमवारी सापडले. अजूनही सात जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
मृतदेह शोधण्यासाठी पाणबुडे प्रयत्नांची शर्थ करीत आहेत, असे संबळपूर जिल्हय़ाचे पुनर्वसन आयुक्त पी. के. मोहपात्रा यांनी सांगितले. बुडालेल्या बोटीचा थांग या पाणबुडय़ांना अर्थात स्कूबा डायव्हर्सना लागला आहे. राज्य सरकारने मृतांच्या नातेवाइकांना दीड लाख सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली असून, वाचलेल्यांवर मोफत उपचार केले जात आहेत.  
विधिमंडळ कामकाजमंत्री कल्पतरू दास यांनी सांगितले, की संबळपूरच्या लायन्स क्लबचे ११४ सदस्य हिराकूड धरणावर सहलीस गेले होते. परत येताना ते टिला घाट येथून यांत्रिक बोटीत बसून निघाले. आजूबाजूच्या खेडय़ातील ३० लोक या बोटीत होते. ते दुचाक्यांसह या बोटीत बसले. प्रवाशांची गर्दी जास्त असल्याने बोटचालकाने काहींना उतरण्यास सांगितले, मात्र लोकांनी दुर्लक्ष केले.