Bolivia Plane Crash: भारतात गेल्या महिन्याभरात विमान कोसळण्याच्या काही घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर इतर देशातही विमान कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया देशाच्या राजधानीत हवाई दलाचे विमान रहदारीच्या रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली आहे. बोलिव्हियाची राजधानी ला पाझजवळील एल अल्टो शहरात शुक्रवारी बोलिव्हियन हवाई दलाचे हर्क्युलस विमान कोसळून १५ जणांचा मृत्यू झआला तर ३० जण जखमी झाले आहेत.
रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, एल अल्टो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेताच काही वेळातच जवळ असलेल्या दाट लोकवस्तीच्या परिसरातील एका वर्दळीच्या रस्त्यावर हे विमान कोसळले. विमान कोसळल्यामुळे रस्त्यावरील अनेक वाहनांना धडक बसली. तसेच विमानाचे अवशेष पसरल्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
स्थानिक यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, विमानातील केबिन क्रू आणि रस्त्यावरील सामान्य नागरिकांचा या अपघातात मृत्यू झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते.
Breaking: A Bolivian Air Force Hercules transport plane impacted a crowded street in El Alto, near La Paz, earlier this evening. The aircraft sustained severe damage, and initial reports indicate several people lost their lives while others were injured on the ground. pic.twitter.com/GLsxnBAqWz
— Usman Goraya (@MrHunny01) February 28, 2026
नोटा गोळा करण्यासाठी झुंबड
हवाई दलाचे विमान कोसळल्यानंतर विमानातील चलनी नोटा रस्त्यावर विखुरल्या गेल्या होत्या. या नोटा गोळा करण्यासाठी स्थानिकांची झुंबड उडाल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. यासंबंधीचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये विमान अपघाताच्या शेजारी मोठी गर्दी दिसत असून गोंधळाचे वातावरण दिसत आहे. लोकांची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
अपघाताचे कारण काय?
अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी खराब हवामानामुळे विमान कोसळले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. सदर अपघातानंतर एल अल्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ काही काळासाठी बंद करण्यात आले आहे.
