सिनेसृष्टीतले कलाकार मोदींना मतदान करू नका असे म्हणत आहेत. कोणत्या कलाकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली? असा प्रश्न तावडेंनी उपस्थित केला. त्याचसोबत यापूर्वी कलाकारांना खंडणीसाठी धमक्या येत. मागील पाच वर्षात एका तरी कलाकाराला खंडणीसाठी धमकी आली का? असाही प्रश्न तावडेंनी विचारला. मागील पाच वर्षात अशी एकही घटना घडली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

याच वेळी त्यांनी राज ठाकरेंच्या भाषणावरही टीका केली. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील भाषणात भारताने पाकिस्तानची एफ १६ विमाने पाडली नाहीत. पाकिस्तानमधील एफ १६ विमानाचे ऑडिट करण्यात आल्याचा दावा फॉरेन पॉलिसी या मॅगजिनच्या हवाल्यानुसार दिला होता. परंतु प्रत्यक्षात पेन्टॅगॉनने मात्र याचा स्पष्ट पणे इन्कार केला असून असे कुठलेही ऑडिट झालेले नाही असे स्पष्ट केले होते असे स्पष्ट करताना तावडे म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सध्या महाराष्ट्र पीपीटी नवनिर्माण सेना झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

गेल्या ४० वर्षाच्या सत्तेच्या काळात शरद पवार यांचे घर पैशांनी भरले आहे, पण नरेंद्र मोदी यांची भूमिका ‘न खाता हू और न खाने दूंगा’ अशी असल्यामुळेच मोदी यांचे घर रिकामे आहे. शरद पवार यांचे घर का भरले हे देशाच्या जनेतला माहीत आहे. मोदींविरोधात तुम्ही भ्रष्टाचाराचे एकही आरोप करु शकला नाहीत असेही तावडेंनी म्हटले.