Kerala Latest News केरळमधील तिरुअनंतपुरम येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (CPIM) मुख्यालयावर बॉम्ब हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. गुरुवारी रात्री ११.३० सुमारास हा बॉम्बहल्ला झाला. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

हेही वाचा- जम्मू-काश्मीरमध्ये ‘जी २०’ची बैठक घेण्यास चीनचा विरोध

पोलिसांचा तपास सुरु

समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती दुचाकीवर येतो आणि गाडी मागे वळवण्याच्या बहाण्याने मुख्यालयावर बॉम्ब फेकून निघून गेल्याचे दिसत आहे. या हल्ल्यानंतर सीपीआय कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून बॉम्ब फेकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.

काँग्रेसवर आरोप
सीपीआय(एम) चे राज्य सचिव कोडियेरी बालकृष्णन यांनी यूडीएफला भडकवण्यासाठी हा बॉम्ब हल्ला केला असल्याचा आरोप केला आहे. तर काँग्रेसनेच हा हल्ला केला असल्याचा आरोप सीपीआयचे आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ए. रहीम यांनी केला आहे. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.