scorecardresearch

बेल्जियममध्ये बॉम्बस्फोटात ३५ ठार, २०० जखमी

या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली आहे

ब्रसेल्सच्या विमानतळावरील स्फोटांत जखमी झालेल्या महिला.
ब्रसेल्स विमानतळ, मेट्रो स्थानक लक्ष्य; आयसिसने जबाबदारी स्वीकारली

फ्रान्समध्ये पॅरिस येथे नोव्हेंबरमध्ये झालेल्या हल्ल्यातील सूत्रधार अब्देसलाम यांच्यासह पाच जणांना बेल्जियममध्ये अटक झाल्यानंतर दहशतवाद्यांनी ब्रसेल्स विमानतळ व मेट्रोमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यात ३५ जण ठार झाले असून, २०० जखमी झाले आहेत. तेथील प्रमाणवेळेनुसार सकाळी ८ वाजता झावेनटेम विमानतळावर मुख्य कक्षात दोन स्फोट झाले व तिसरा स्फोट मालबीक मेट्रो स्टेशनवर झाला. या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली आहे.
हा हल्ला भ्याड, हिंसक होता. आजचा दिवस हा काळा दिवस ठरला, अशी प्रतिक्रिया बेल्जियमचे पंतप्रधान चार्लस मिशेल यांनी व्यक्त केली.
अग्निशामक दलाचे प्रवक्ते पिअर मेस यांनी सांगितले, की विमानतळावर ११ तर मालवीक भूमिगत मेट्रो स्टेशनवर १५ हून अधिक लोक ठार झाले आहेत. कामाची वेळ असल्याने बरीच गर्दीही होती.
बेल्जियमच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ३५ जण ठार झाले असून २०० हून अधिक लोक जखमी आहेत.
दरम्यान, नंतर आपत्कालीन मदत सुरू करण्यात आली आहे. विमानतळावर घबराट पसरली होती व गोंधळाचे वातावरण होते. स्फोटामुळे निर्गमन कक्षातील खिडक्या कोसळल्या, छत पडले.
बेल्गा वृत्तसंस्थेने म्हटले आहे, की काही लोकांच्या अरबी भाषेतील घोषणा ऐकू आल्या. ब्रसेल्सच्या विमानतळावर या स्फोटाने मोठे नुकसान झाले आहे. विमानतळावर एकूण दोन स्फोट झाले नंतर इमारत रिकामी करण्यात आली. पोलिसांची वाहने व मदत पथके घटनास्थळी दाखल झाली. विमानतळाची सेवा लगेच थांबवण्यात आली.
अंतर्गत सुरक्षामंत्री जॅन जॅम्बॉन यांनी सांगितले, की बेल्जियमवर दहशतवादी हल्ल्याच्या धोक्याची पातळी तीन ऐवजी चार झाली आहे. ब्रिटन, नेदरलँड्स, फ्रान्स व जर्मनी या देशांच्या विमानतळांवर सुरक्षा कडक करण्यात आली आहे. ब्रसेल्स येथे स्फोट झाल्यानंतर विमानउड्डाणे रद्द करण्यात आली. मेट्रो, ट्राम व बस सेवाही थांबवण्यात आली. युरोपीय समुदायाचे मुख्यालय ब्रसेल्स येथे असून लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे. स्वीडनचे पंतप्रधान स्टेफन लोफवान यांनी लोकशाही युरोपवरचा हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगण्यात आले.
आम्ही स्फोटांचे आवाज ऐकले व उद्वाहक म्हणजे लिफ्टमध्ये रक्तबंबाळ झालेले लोक होते, असे प्रवाशांनी सांगितले.
या स्फोटांमुळे मला तर धक्काच बसला असून आम्ही बेल्जियमला मदत करू, असे ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनी सांगितले.
पहिल्यांदा छत कोसळले नंतर बंदुकीच्या दारूचा वास आला. आम्ही लिफ्टमधून उतरलो तेव्हा दुसरा स्फोट झाला, असे लिब्यू यांनी सांगितले. तर, विमातळावर गोंधळाचे वातावरण होते, असे ब्रिटिश पत्रकार शार्लट मॅकडोनाल्ड गिब्सन यांनी सांगितले.
पंतप्रधानांकडून हल्ल्यांचा निषेध
नवी दिल्ली- बेल्जियममधील दहशतवादी हल्ल्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे, ही घटना अस्वस्थ करणारी आहे असे त्यांनी सांगितले. दरम्यान, मृतांमध्ये कुणाही भारतीयाचा समावेश नाही असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील आठवडय़ात भारत-युरोपीय समुदाय यांच्या बैठकीसाठी ब्रसेल्सला जात असून, त्यांनी आत्मघाती हल्ल्यानंतर असे म्हटले आहे, की ब्रसेल्सची घटना अस्वस्थ करणारी आहे. या हल्ल्याचा मी निषेध करतो. मोदी ३० मार्चला बेल्जियमला जात असून, तेथून ते ३१ मार्चला वॉशिंग्टन येथे अणुसुरक्षा शिखर बैठकीसाठी जाणार आहेत.
जेट एअरवेजचे दोन कर्मचारी जखमी
जेट एअरवेजचे दोन कर्मचारी ब्रसेल्स स्फोटात जखमी झाले आहेत. जेट एअरलाइन्सच्या प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. प्रवासी व कर्मचारी यांना आता विमानतळावरील टर्मिनसवर येण्यास प्रतिबंध केला आहे.
फ्रान्समधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ
* ब्रसेल्सच्या विमानतळावर झालेल्या बॉम्बस्फोटांच्या पाश्र्वभूमीवर फ्रान्समधील सुरक्षा व्यवस्थेत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून विमानतळे आणि रेल्वे स्थानकांवरील बंदोबस्त वाढविण्यात आला.
* चार्लस् डी गॉल विमानतळावरील सर्वच्या सर्व म्हणजे आठ टर्मिनल्सवरील आणि दोन रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली. पॅरिसच्या दक्षिणेकडील ऑर्ली विमानतळ आणि तौलौस शहरात सुरक्षा वाढवण्यातआली.

*रेल्वे स्थानके, सार्वजनिक परिवहन सेवा येथेही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बेल्जियममध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वॉ ओलांद यांनी पंतप्रधान आणि अंतर्गत मंत्र्याची तातडीची बैठक घेतली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bomb blast at brussel

ताज्या बातम्या