रशियाने युक्रेनवरील हल्ला आणखी तीव्र केलाय. रशियाच्या या आक्रमक भूमिकेमुळे संपूर्ण जग जागतिक युद्धाच्या छायेखाली आहे. असे असताना पाकिस्तानमधील पेशावर येथील एका मशिदीत आज (शुक्रवार) बॉम्बस्फोट झालाय. या घटनेमध्ये एकूण ३० जणांचा मृत्यू झाला असून तब्बल ५० नागरिक जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही. मात्र या घटनेमुळे संपूर्ण जग धास्तावले आहे.

पाकिस्तानमधील पेशावर येथे शुक्रवारी काही नागरिक नमाज पठणासाठी मशिदीमध्ये जमा झाले होते. मात्र यावेळी येथे अचानक बॉम्बस्फोट झाला. या स्फोटामध्ये तब्बल ३० नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. तर जवळपास ५० पेक्षा जास्त लोक या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. यामध्ये १० जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पेशावरमधील शासकीय अधिकाऱ्यांनी या हल्ल्याबाबत प्राथमिक माहिती दिली आहे. बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तसेच हा आत्मघाती हल्ला असावा, असं या अधिकाऱ्याने सांगितलंय. दरम्यान एकीकडे रशियाने युक्रेनविरोधात छेडलेल्या युद्धात आतापर्यंत शेकडो नागरिकांचा मृत्यू झालाय. तर लाखो नागरिक विस्थापित झालेयत. असे असताना पाकिस्तानमध्ये झालेला हा बॉम्बहल्ला आता जागतिक पातळीवर चिंतेचा विषय ठरतोय.