दमास्कस : सीरियन सैनिकांना घेऊन जाणाऱ्या एका बसला जोडलेल्या दोन बॉम्बचा राजधानी दमास्कसमध्ये बुधवारी सकाळी गर्दीच्या वेळेत स्फोट होऊन १४ जण ठार, तर अनेक जण जखमी झाले. अलीकडच्या काही वर्षांत दमास्कसमध्ये झालेला हा सर्वात भीषण हल्ला आहे.

प्रवासी आणि शाळकरी विद्यार्थी दररोज गोळा होतात, त्या मुख्य ‘बस ट्रान्सफर पॉइंट’जवळील एका वर्दळीच्या चौकात हे स्फोट झाले. या स्फोटानंतर जळालेल्या बसमधून धुराचे लोट उठत असून सैनिक बसखाली उतरत असल्याची दृश्ये सरकारी दूरचित्रवाहिनीने दाखवली. अद्याप कुणीही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नसली, तरी अध्यक्ष बशर असद यांची राजवट उलथू इच्छिणारे अनेक दहशतवादी व जिहादी गट सीरियात सक्रिय आहेत.  अध्यक्ष बशर असद यांच्या फौजांनी २०१८ साली विरोधी फौजांना राजधानीच्या उपनगरांतून हुसकावून लावल्यापासून दमास्कसमधील बॉम्ब हल्ल्यांचे प्रकार अतिशय दुर्मीळ झाले आहेत.