Bomb Blast in Mosque at Khyber Pakhtunkhwa : पाकिस्तान नुकताच एका रेल्वेवर झालेला दहशतवादी हल्ला व अपहरणाच्या घटनेतून सावरत होता, तेवढ्यात तिथल्या यंत्रणेसमोर आणखी एक आव्हान उभं ठाकलं आहे. पाकिस्तानमधील खैबर पख्तुन्वा प्रांतातील दक्षिण वजीरिस्तानमधील आझम बरसात बाजारात असलेल्या एका मशिदीत मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. दहशतवाद्यांनी जमीयत उलेमा-ए-इस्लाम वानाच्या मौलाना अब्दुल अजीज मशिदीचे प्रचारक मौलाना अब्दुल्लाह नदीम यांना लक्ष्य केलं आहे. या बॉम्बस्फोटात मौलाना नदीम यांच्यासह अनेक जण जखमी झाले आहेत.
मौलाना अब्दुल्ला नदिम यांच्यावर यापूर्वी देखील अशाच प्रकारचा हल्ला झाला होता. एका रिमोट कंट्रोल्ड स्फोटातून ते बचावले होते. त्यांना जीवे मारण्यासाठी कलुशाह येथे दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला होता. त्या स्फोटातून ते बचावले. मात्र, ते जखमी झाले होते. आता त्यांना मारण्यासाठी पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला आहे. या हल्ल्यातही ते वाचले आहेत.
मौलाना अब्दुल्लाह नदीम गंभीर जखमी
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार शुक्रवारी (१४ मार्च) जुम्म्याची सामूहिक नमाज अदा (पठण) करण्यासाठी अनेक लोक आझम बरसात बाजारातील मशिदीत जमले होते. त्याचवेळी मशिदीत मोठा स्फोट झाला. मौलाना अब्दुल्लाह नदीम या स्फोटात जखमी झाले असून त्यांना लोकांनी जवळच्या रुग्णालयात नेलं. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस व सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलीस व सुरक्षा बलाचे अधिकारी मशीद व आसपासच्या परिसराची पाहणी करत आहेत. हल्लेखोरांचा सुगावा लावण्यासाठी पुरावे गोळा करत आहेत.
एका धक्क्यातून सावरण्यआधीच दुसरा दहशतवादी हल्ला
पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये फुटीरतावाद्यांनी पेशावरच्या दिशेने जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसवर हल्ला करून या ट्रेनचं प्रवाशांसह अपहरण केलं होतं. जवळपास ४४० प्रवासी दहशतवाद्यांच्या ताब्यात होते. यापैकी २१ प्रवाशांचा मृत्यू झाला असून उर्वरित प्रवाशांची सुटका करण्यात पाकिस्तान लष्कराला यश मिळालं. दोन दिवस हे अपहरणनाट्य आणि दहशतवादी-लष्करातील चकमक चालली. पाकिस्तानच्या लष्कराने हा हल्ला घडवून आणणाऱ्या सर्व ३३ दहशतवाद्यांना ठार करून प्रवाशांची सुटका केल्याचं तिथल्या सरकारने जाहीर केलं आहे. मात्र तिथले नागरिक या हल्ल्याच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत.