बिल क्लिंटन आणि हिलरी क्लिंटन यांच्या न्यूयॉर्क येथील निवासस्थानी स्फोटक आढळून आले आहे. असोसिएट प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार बुधवारी क्लिंटन यांच्या घरात एक वस्तू सापडली आहे. या घरात क्लिंटन दाम्पत्य राहतात. अशाच प्रकारची वस्तू अब्जाधीश जॉर्ज सोरेस यांच्या घरीही आढळून आली होती. त्याचबरोबर माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या वॉशिंग्टन येथील कार्यालयातही अशीच संशयित वस्तू सापडली आहे. व्हाइट हाऊस आणि टाइम वॉर्नर सेंटरला (सीएनएन) एक संशयित पार्सल मिळाले आहे. याचाही तपास केला जात आहे. बॉम्ब सापडल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेतला असून तपास केला जात आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार क्लिंटन यांच्या इ- मेलचे काम पाहणाऱ्या एका टेक्निशयनला ही वस्तू सापडली. एफबीआय आणि स्थानिक पोलीस याचा तपास करत आहेत.

घटनेच्या दोन दिवस आधी डेमोक्रॅटिक पक्षाचे देणगीदार जॉर्ज सोरेस यांच्या घरीही अशाच प्रकारची वस्तू सापडली होती. या संपूर्ण घटनेमागे नेमके कोण आहे, याची माहिती समजू शकलेली नाही.

‘सीएनएन’नेही संशयास्पद पार्सल आल्याने आपले न्यूयॉर्क येथील कार्यालय रिकामे केले आहे. सीएनएनमध्ये सापडलेली वस्तू ही पाइप आणि इलेक्ट्रिक तारांनी बनवलेली होती. तपास अधिकारी या स्फोटकाचा तपास करत असल्याचे एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले. सीएनएनच्या पार्सल कक्षात हे स्फोटक सापडले.

याप्रकरणी व्हाइट हाऊसने एक निवेदन प्रसिद्ध केले असून या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. दहशतवाद्यांचे हे घृणास्पद कृत्य असल्याचे व्हाइट हाऊसने म्हटले आहे.