अहमदाबादहून मुंबईकडे निघालेल्या जेट एअरवेजच्या विमानात बॉम्ब ठेवल्याच्या भीतीने या विमानाची उड्डाणापूर्वी कसून तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर संशयास्पद काहीही न आढळल्याने सुमारे तीन तासांनी हे विमान उड्डाणासाठी सज्ज करण्यात आले. बुधवारी सकाळी अहमदाबादच्या सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली.
अहमदाबादहून मुंबईकडे निघालेल्या विमानामध्ये १२५ प्रवासी आणि सहा कर्मचारी होते. विमान उड्डाणासाठी तयार झाल्यावर त्यात बॉम्ब असल्याच्या भीतीने हे विमान विमानतळावरच निर्जनस्थळी नेण्यात आले. सर्व प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे उतरविण्यात आल्यानंतर सुरक्षारक्षकांकडून आणि बॉम्बशोधक पथकाकडून विमानाची तपासणी करण्यात आली. प्रवाशांचे सामानही तपासण्यात आले. बॉम्ब नसल्याचे स्पष्ट झाल्यावर पुन्हा हे विमान उड्डाणासाठी सज्ज करण्यात आल्याचे जेट एअरवेजच्या प्रवक्त्याने सांगितले.