रविवारी पोलंडहून ग्रीसला जाणाऱ्या रायनएअरच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली. यावेळी या विमानातून एकूण १९० लोक प्रवास करत होते. बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यानंतर ग्रीसच्या दोन लढाऊ विमानांच्या मदतीने संबंधित विमानाचं सुरक्षितपणे लँडिंग करण्यात आलं. सर्व १९० प्रवासी सुखरूप असून त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. या विमानाची तपासणी सुरू आहे. याबाबतची माहिती ग्रीसच्या संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यानंतर, ग्रीसच्या दोन लढाऊ विमानांनी तातडीने उड्डाण केलं. या दोन लढाऊ विमानाच्या मदतीने संबंधित विमान सुरक्षितपणे अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करण्यात आलं. या विमानाने कॅटोविस येथून अथेन्ससाठी उड्डाण केलं होतं.
दरम्यान, उत्तर मॅसेडोनियाच्या हवाई हद्दीतून जाताना विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली. त्यानंतर विमानाचं आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आलं, असं वृत्त एएफपीने सूत्राच्या हवाल्याने दिलं. विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी नेमकी कुणी दिली? याची माहिती अद्याप मिळाली नाही. या घटनेचा तपास स्थानिक पोलीस करत आहेत.