लंडन : कथात्म साहित्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बुकर पुरस्कारांसाठी यंदाची नामांकनांची लघुयादी जाहीर झाली असून यंदा पाच राष्ट्रांमधील सहा कादंबऱ्यांचा त्यात समावेश आहे.

श्रीलंकी लेखक शेहान करूणतिलका यांच्या ‘द सेव्हन मून्स ऑफ माली अल्मेडा’ ही कादंबरी यंदा आशियाई राष्ट्रांमधील लेखकांचे स्पर्धेत प्रतिनिधित्व करीत असून ८७ वर्षांचे ब्रिटिश लेखक अ‍ॅलन गार्नर यांच्या ‘ट्रीकल वॉकर’ला नामांकन मिळाले आहे. गार्नर हे बुकरसाठी नामांकन मिळालेले आतापर्यंतचे सर्वात ज्येष्ठ साहित्यिक आहेत. याखेरीज अमेरिकेच्या एलिझाबेथ स्ट्राऊट यांची कुटुंब कहाणी ‘ओह विल्यम’ , झिम्बाब्वेच्या नोव्हायोलेट बुलावायो यांची राजकीय कादंबरी ‘ग्लोरी’ , अमेरिकी लेखक पर्सिवल एवरेट यांची ‘द ट्रीज’ ही रहस्यकथा , आणि क्लेअर कीगन या आयरिश लेखिकेची स्मॉल ‘थिंग्ज लाईक दीज’ धर्मकेंद्रीत कादंबरी यंदा पुरस्काराच्या स्पर्धेत आहेत.   

हेही वाचा >>> विरोधी पक्षाचा एकही नेता भाजपाला घाबरणार नाही – राहुल गांधींचा हल्लाबोल!

यंदाच्या परीक्षक समितीचे अध्यक्ष इतिहासतज्ज्ञ नील मॅकग्रेगर पुरस्कारांची घोषणा करताना म्हणाले की, ‘या सर्व लेखकांनी केवळ त्यांच्या कादंबरीत काय घडते आहे, ते पोहोचवणारीच भाषा वापरली आहे असे नव्हे, तर त्यांनी एक जग किंवा विश्व निर्माण केले आहे, ज्यात आपण बाहेरचे म्हणून प्रवेश करतो आणि ते आपलेसे करतो.’ पुरस्काराची महती सांगताना ते म्हणाले की, ‘इंग्रजी भाषेची किमया आणि शब्दांची जादू अनुभवण्याची संधी बुकर पुरस्कारांमुळे मिळते.

परीक्षक समितीमध्ये मॅकग्रेअर यांच्यासह शिक्षणतज्ज्ञ शाहिदा बारी, इतिहासतज्ज्ञ हेलन कॅस्टर, टीकाकार एम जॉन हॅरीसन, साहित्यिक अलीन माबांकोऊ यांचा समावेश आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी निवड समितीकडे १६९ कादंबऱ्या आल्या होत्या.  

वेगळे काय?

यंदा पहिल्यांदाच नवोदित कादंबरीकारांचा लघुयादीत समावेश नाही.  यादीमध्ये अवघ्या २० वर्षांची अफ्रो-अमेरिकी लेखिका लैला मोटली हिची पहिलीच कादंबरी ‘नाईटक्रॉलिंग’चा समावेश होता. याखेरीज शाफो (सेल्बी विन श्वार्टझ्) आणि मॅप्स ऑफ अवर स्पेक्युलेटर बॉडीज (मॅडी मोर्टायमर) या लेखकांच्या पहिल्या कादंबऱ्याही मोठय़ा यादीत समावेश होता. 

थोडी माहिती..

पुरस्काराची घोषणा १७ ऑक्टोबरला केली जाणार असून विजेत्याला ५०,००० पौंड (सुमारे ४५ लाख ६५ हजार रुपये) रोख पारितोषिक दिले जाईल.

पुरस्काराविषयी.. ब्रिटन आणि आर्यलडमध्ये प्रकाशित झालेल्या इंग्रजीतील सर्वोत्तम कादंबरीला दरवर्षी बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

हा पुरस्कार साहित्यिक आणि त्याच्या लेखनाला नव्या उंचीवर नेऊन ठेवतो असे मानले जाते.