नाताळमध्येही पुन्हा करोनामुळे निर्बंध लागू करावे लागू नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ब्रिटनच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

लंडन : हिवाळ्यामध्ये करोनाचा संसर्ग वाढून नवी लाट टाळण्यासाठी ब्रिटन सरकारने करोना लशीची वर्धक मात्रा  मध्यमवयीन नागरिकांनाही देण्याचा निर्णय सोमवारी घेतला आहे. लसीकरण आणि प्रतिकारक्षमता निर्मितीच्या संयुक्त समितीने सांगितले की ४० ते ४९ वयोगटातील नागरिक देखील त्यांच्या दोन्ही लसमात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी वर्धक मात्रेसाठी पात्र असतील. या आधी ५० वर्षांवरील नागरिक वर्धक मात्रेसाठी पात्र होते.

ऑस्ट्रियामध्ये निर्बंध

बर्लिन : करोना प्रतिबंधक लस न घेतलेल्यांसाठी ऑस्ट्रियामध्ये सोमवारपासून टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.  ती २४ नोव्हेंबपर्यंत  असेल.  १२ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले नाही त्यांना केवळ रोजगार, किराणाखरेदी, व्यायाम तसेच लसीकरणासाठीच बाहेर पडता येईल.