लंडन : UK Political Crisis News तीन वर्षांपूर्वी सत्तेवर आरूढ झाल्यापासूनच अनेक वादांत अडकल्याने सहकाऱ्यांचा रोष ओढवून घेणारे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन अखेर गुरुवारी पायउतार झाल़े  नव्या नेतृत्वाच्या निवडीपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळणार असल्याचे जॉन्सन यांनी राजीनाम्याची घोषणा करताना सांगितल़े

आरोग्यमंत्री साजिद जाविद आणि अर्थमंत्री ऋषी सुनाक यांनी मंगळवारी राजीनामे दिल्याने जॉन्सन यांची खुर्ची डळमळीत झाल्याचे स्पष्ट झाले होत़े  त्यापाठोपाठ आणखी तीन कनिष्ठ मंत्री आणि सॉलिसिटर जनरल यांनीही पदत्याग केल्यामुळे जॉन्सन हे पायउतार होतील, अशी चर्चा होती़  मात्र, काही दिवस हेकेखारी करणाऱ्या जॉन्सन यांना वाढत्या दबावामुळे पायउतार व्हावे लागल़े  

‘‘खांदेपालट व्हायला हवा, अशी हुजूर पार्लमेंटरी पक्षाची इच्छा दिसत आह़े  त्यामुळे मी नेतृत्वपदावरून पायउतार होत असून, नव्या नेतृत्व निवडीचा मार्ग मोकळा झाला आह़े  त्याचे वेळापत्रक पुढील आठवडय़ात जाहीर होईल़  नव्या नेतृत्वाच्या निवडीपर्यंत मी हंगामी पंतप्रधान म्हणून धुरा सांभाळीन, ’’ असे जॉन्सन यांनी पंतप्रधान निवासस्थानाजवळ केलेल्या भाषणात जाहीर केल़े

जॉन्सन यांनी राजीनामा देताना आपल्या कार्यकाळातील कामांचा आवर्जून उल्लेख केला़  ‘ब्रेग्झिट’पासून ते करोनास्थिती हाताळणीपर्यंत आपल्या सरकारने उत्तम कामगिरी केली़  शिवाय, रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाविरोधात ब्रिटनने पाश्चात्य देशांचे नेतृत्व केल्याचेही जॉन्सन म्हणाल़े

करोना निर्बंध लागू असतानाही १०, डाऊनिंग स्ट्रीट, या पंतप्रधान निवासस्थानी स्नेहभोजनांचे घाट घातल्याने जॉन्सन हे अडचणीत आले होत़े  या ‘पार्टीगेट’प्रकरणी त्यांना अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागले होत़े  त्यातच हुजूर पक्षाचे (कॉन्झव्‍‌र्हेटिव्ह पार्टी) उपमुख्य प्रतोद ख्रिस पिंचर यांच्या नियुक्तीवरून जॉन्सन हे वादात सापडल़े  पिंचर यांनी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप आह़े  त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आह़े  त्यांनी गेल्याच आठवडय़ात राजीनामा दिला असला तरी जॉन्सन यांनी हे प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळल्याने त्यांच्यावर सहकाऱ्यांचा रोष वाढत गेला़  त्यामुळे जॉन्सन यांच्या कार्यक्षमतेवर आणि निष्ठेवर अविश्वास दर्शवत ५० हून अधिक जणांनी सरकार आणि प्रशासनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला़  एकापाठोपाठ एका मंत्र्याच्या राजीनाम्यानंतरही सुरूवातीला ते पदत्यागास तयार नव्हत़े  मात्र, दबाव वाढू लागल्याने अखेर जॉन्सन यांनाही पदत्याग करावा लागला़

जॉन्सन यांच्या राजीनाम्यामुळे आता हुजूर पक्षाच्या नेतृत्वपदासाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळेल़  नव्या नेतृत्व निवडीच्या कार्यक्रमाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आह़े 

उत्तराधिकारी कोण?

हुजूर पक्षाचे नेतृत्व आणि पंतप्रधानपदासाठी अ‍ॅटर्नी जनरल सूएल्ला ब्रेव्हरमन, परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस, माजी परराष्ट्रमंत्री जेरेमी हंट, संरक्षणमंत्री बेन वॉलेस, उपपंतप्रधान डॉमिनिक राब, माजी अर्थमंत्री ऋषी सूनाक, नवनियुक्त अर्थमंत्री नधीम झहावी यांची नावे चर्चेत आहेत. ब्रेव्हरमन यांनी नेतृत्वपदासाठी रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली असून, त्या भारतीय वंशाच्या आहेत. अनेक बडय़ा नावांच्या चर्चेमुळे जॉन्सन यांचे उत्तराधिकारी कोण, याबाबत उत्सुकता आह़े 

जनतेने २०१९ मध्ये प्रचंड बहुमताने निवडून दिलेले असल्याने त्या जनादेशाचा अवमान होऊ नये, यासाठी पदावर कायम राहण्याची माझी भूमिका होती़  २०१९ मध्ये दिलेल्या वचनांची पूर्तता करण्याचा माझा प्रयत्न होता़  मात्र, याबाबत सहकाऱ्यांची समजूत घालण्यात अपयश आले आणि पदत्यागाचा निर्णय घ्यावा लागला़  – बोरिस जॉन्सन, हंगामी पंतप्रधान