Ludhiana Old Couple Suicide: ‘आम्ही गरिबीत जन्मलो आणि गरिबीतच मरत आहोत’, हे वाक्य गुरमीत सिंग आणि त्यांच्या पत्नी नरींदर कौर यांनी मरण्यापूर्वी सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या तीन मुलांना तर धक्का बसलाच, पण गावकरीही हैराण झाले आहेत. आई-वडिल आपल्या मुलांसाठी सर्वकाही करतात. त्यांना हव्या त्या गोष्टी पुरवतात, त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजतात. पण त्यांच्या मनाचा ठावठिकाणा लागत नाही. पंजाबच्या वृद्ध दाम्पत्याने केलेल्या आत्महत्येनंतर आता विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

लुधियाना जिल्ह्यातील पामल गावात राहणाऱ्या गुरमीत सिंग (५५) आणि त्यांच्या पत्नी नरींदर कौर (५०) यांनी बुधवारी (६ मे) राहत्या घरात स्वतःची जीवनयात्रा संपवली. त्यांची दोन मुले कॅनडामध्ये स्थायिक असून एक मुलगा लुधियानाच्या नामांकित रुग्णालयात नोकरी करत आहे. तरीही गरिबीचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सिंग दाम्पत्यांनी दोन पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. गरिबीमुळे आणि आयुष्यात आता काही रस उरला नसल्यामुळे आम्ही हे टोकाचे पाऊल स्वेच्छेने उचलत आहोत. यासाठी कोणालाही जबाबदार ठरवू नये. तसेच आमच्या मुलांनाही त्रास देण्यात येऊ नये, असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे.

लुधियाना ग्रामीण पोलिसांचे उपायुक्त करण सिंग संधू यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, या नोटमध्ये आम्ही “गरिबीत जन्मलो, गरिबीतच मरत आहोत”, असा उल्लेख करण्यात आला आहे. संधू पुढे म्हणाले, “आमच्या निर्णयाबद्दल मुलांना जबाबदार धरण्यात येऊ नये आणि त्यांना आम्ही आणखी पुढे मदत करू शकणार नाही. आमच्या मुलांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात येऊ नये.”

या दाम्पत्याचा मोठा मुलगा आणि मुलगी कॅनडामध्ये स्थायिक झालेले आहेत. तर लहान मुलगा लुधियानाच्या दयानंद मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात वॉर्ड अटेंडन्ट म्हणून काम करत आहे.

aligarh railway station woman suicide attempt daughter saves mother
“आई नको…”, चालत्या ट्रेनसमोर उडी मारणाऱ्या आईला ७ वर्षांच्या चिमुकलीने खेचलं मागे; काळजाचा ठोका चुकवणारा थरार (बातमी वाचण्यासाठी क्लिक करा)

मुलांना कॅनडात पाठविण्यासाठी जमीन विकली

गावकऱ्यांनी सांगितले की, दाम्पत्याने आपल्या मुलांना कॅनडात पाठविण्यासाठी त्यांची दोन ते अडीच एकरची जमीन विकली. जमीन विकल्यानंतर नरींदर कौर नैराश्यात गेल्या. त्यांच्या उपचारावर गुरमीत यांनी खूप पैसे खर्च केले. गुरमीत यांनी बरेच प्रयत्न केले पण नरींदर यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही.

पोलिसांनी सांगितले की, आजारपण, आर्थिक चणचण आणि मुले दूरवर असणे यातून कदाचित दाम्पत्याने हा टोकाचा निर्णय घेतला असावा.

पोलीस उपायुक्त संधू म्हणाले की, दाम्पत्याचा लहान मुलगा खुशमिंदर सिंग (२२) हा रात्रपाळी करून पहाटे ३.३० वाजता बुधवारी घरी परतला. तेव्हा त्याला घरात आई-वडिलांचा मृतदेह आढळून आला. खुशमिंदरने सांगितले की, दोघेही जमिनीवर बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले. यावरून त्यांनी काहीतरी विषारी पदार्थ घेतला असल्याचा संशय आला.

खुशमिंदर पुढे म्हणाला की, माझ्या आई-वडिलांनी सुसाईड नोटमध्ये गरिबीचा उल्लेख केला, यावर त्याला विश्वासच बसत नाही. “माझी आई बऱ्याच काळापासून नैराश्याशी लढत होती. वडिलांनी तिच्या उपचारावर बरेच पैसे खर्च केले. त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. कदाचित वडिलांना आईचे दुःख पाहावले नसेल. आम्ही सर्व भावंडे त्यांना जमेल तशी मदत करत होतो. त्यांच्यासाठी आम्ही नवे घर बांधण्याचाही निर्णय घेतला होता. तसेच कॅनडामध्ये राहणाऱ्या मोठ्या भावाने तर यंदाच्या हिवाळ्यात त्यांच्यासाठी व्हिसा पाठविण्याची तयारी सुरू केली होती.

jaipur 9 year old girl jumped to death
वर्गातल्या मुलांचा मानसिक छळ असह्य होऊन ९ वर्षांच्या मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; पालकांचे शाळेवर गंभीर आरोप (बातमी वाचण्यासाठी क्लिक करा)

खुशमिंदर पुढे म्हणाला की, माझा मोठा भाऊ कॅनडाहून अधूनमधून व्हिडीओ कॉल करायचा. तसेच पैसे पाठवू का, अशी विचारणाही करायचा. माझे आई-वडील थट्टा मस्करी करताना म्हणायचे की, आमची आता या जगातून निघण्याची वेळ आली आहे. पण आम्ही त्यांना असे अभद्र बोलत जाऊ नका, असे सांगत असायचो.

जोधन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गुरचरण सिंग या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले की, प्राथमिकदृष्ट्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचे दिसत आहे. दाम्पत्याने आपली जमीन विकून मुलांना कॅनडात पाठवले होते. ते स्वतः मोडकळीस आलेल्या दोन खोल्यांच्या घरात राहत होते.

मुलांनी त्रास दिल्याचा पुरावा नाही

गुरचरण सिंग पुढे म्हणाले की, मुलांनी पालकांना त्रास दिल्याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. गावकऱ्यांनीही सांगितली की, मुलांनी त्रास दिल्याची बाब पालकांनी कधीही बोलून दाखवली नव्हती.

गावातील रहिवासी राणा नावाच्या व्यक्तीने सांगितले की, गुरमीतने आयुष्यभर काबाडकष्ट केले. आधी त्यांच्या मुलांसाठी आणि नंतर पत्नीच्या उपचारांसाठी ते राबत राहिले. त्यांनी त्यांच्या मुलांशी असलेल्या संबंधाचा कधीही खुलासा केला नाही. पण गुरमीत मात्र नेहमी जगण्याला आता काही अर्थ नाही, असे सांगत असायचा.

पोलीस उपायुक्त संधू म्हणाले की, दाम्पत्याचे शवविच्छेदन करू नये, अशी कुटुंबीयांनी विनंती केली आहे. पण अकस्मात मृत्यू झाल्यामुळे नियमाप्रमाणे शवविच्छेदन करून दोघांचेही पार्थिव कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले आहे. सुसाईड नोटमध्ये लिहिल्याप्रमाणे कुणावरही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही.