जम्मू-काश्मीर विधानसभेतील पीडीपी-भाजप युती सरकारवर या पक्षाच्या सदस्यांनीच सभागृहातील मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून कडाडून टीका केली आहे.
मत्र्यांची सभागृहातील अनुपस्थिती हे एक प्रकारचे नाटक आहे, असे वाटते. शून्य प्रहरात मंत्र्यांच्या गैरहजेरीबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मंत्र्यांना जनतेचे प्रश्न ऐकून घेण्यात काहीही रस नसल्याचे दिसून येत आहे, अशी टीका पीडीपीचे यावर मीर यांनी केली. जम्मू-काश्मीर विधानसभेत २५ पैकी केवळ दोन मंत्री उपस्थित राहतात.
युतीतील काही आमदारांनी आणि भाजप आमदारांनीही मीर यांच्या टीकेला पाठिंबा दिला आहे. सभागृहात उपस्थित असलेले राज्यमंत्री अब्दुल माजिद पादर यांनी या प्रकरणी उपस्थित करण्यात आलेला प्रत्येक मुद्दा नोंदवून घेतला. अन्य मंत्री वरिष्ठ सभागृहात प्रश्नोत्तरांच्या तासाला उपस्थि राहण्यासाठी गेल्याची माहिती पादर यांनी दिली.