पुलवामा हल्ला: अ‍ॅमेझॉनवरुन मागवलं बॉम्बचं साहित्य; एनआयएच्या चौकशीत खुलासा

पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते.

पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यातील आयईडी स्फोटकं बनवण्यासाठी अॅमेझॉन या ई-कॉमर्स साईटवरुन कच्चा माल विकत घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय तपास पथकाच्या (एनआयए) चौकशीतून समोर आली आहे. याप्रकरणी एनआयएने शुक्रवारी आणखी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर ही माहिती समोर आली.

एनआयएच्या माहितीनुसार, पुलवामा हल्ल्यासाठी आयईडी स्फोटकं बनवण्यासाठी सध्या एनआयएच्या ताब्यात असलेल्या एका व्यक्तीने अॅमेझॉनवरुन रसायनांची ऑनलाईन खरेदी केली होती. गेल्या वर्षी झालेल्या या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या आत्मघाती स्फोटात एक आईडी स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्यात घुसवून दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला होता.

एनआयएने शुक्रवारी श्रीनगर येथून बाग-ए-मेहताब भागातील वजीर-उल-इस्लाम (वय १९) आणि पुलवामातील हकरीपुरा गावाचा मोहम्मद अब्बास राठेर (वय ३२) यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्यांची संख्या आता ५ झाली आहे. यापूर्वी एक बापलेक आणि हल्लेखोराच्या जवळच्या सहकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

एनआयएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “प्राथमिक चौकशीत इस्लाम याने खुलासा केला की, जैश-ए-मोहम्मदच्या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या निर्देशानुसार त्याने आयईडी बनवण्यासाठी रसायनं, बॅटरीज आणि इतर सामग्री खरेदीसाठी अॅमेझॉनच्या ऑनलाईन शॉपिंग अकाऊंटचा वापर केला होता. त्याने स्वतः ही सामग्री खरेदी करुन ‘जैश’च्या दहशतवाद्यांपर्यंत पोहोचवली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bought chemicals on amazon to make bomb for pulwama attack says nia report aau