मतदारसंघांची फेररचना

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये नव्या मतदारसंघांची निर्मिती करण्याचे प्रचंड काम करण्यासाठी ‘थेट’ माहिती घेण्याच्या उद्देशाने राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि अधिकारी यांच्याशी संवाद साधण्याकरिता सीमांकन आयोग (डीलिमिटेशन कमिशन) ६ जुलैपासून या केंद्रशासित प्रदेशाचा ४ दिवसांचा दौरा करणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने बुधवारी दिली.

सीमांकन आयोगाच्या अध्यक्ष न्यायमूर्ती (निवृत्त) रंजना प्रकाश देसाई आणि मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात बुधवारी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. ‘या दौऱ्याच्या काळात आयोग राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आणि २० जिल्ह्यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी/ उपायुक्त यांच्यासह केंद्रशासित प्रदेशाचे अधिकारी यांच्याशी संवाद साधेल. जम्मू-काश्मीर पुनर्रचना कायदा २०१९ अन्वये अनिवार्य करण्यात आलेल्या फेररचनेच्या प्रक्रियेशी संबंधित माहिती आयोग थेट त्यांच्याकडून घेईल,’ असे निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने जारी केलेल्या निवेदनात सांगितले.