पीटीआय, बंगळूरु : महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी आपल्या राजकीय अस्तित्वासाठी भाषेचा बागुलबुवा उभा करू नये किंवा सीमेचा मुद्दा मांडू नये, असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी केले. कर्नाटक महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. बरेच कन्नडभाषिक भाग महाराष्ट्रात असल्याचा उल्लेख करून, हे भाग कर्नाटकात सामावून घेण्याबाबत विचार सुरू असल्याचेही बोम्मई म्हणाले.

शेजारच्या कर्नाटक राज्यातील मराठी भाषिक राहात असलेला भाग महाराष्ट्रात सामील करून घेण्यासाठी, सीमाभागात राहणाऱ्या मराठी भाषकांच्या लढय़ाला आम्ही पाठिंबा देतच राहू, असे वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केले होते. त्यावर बोम्मई यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ‘महाराष्ट्रात राजकीय संकट आहे. त्यांचे संपूर्ण सरकार तळाला गेले आहे. त्यामुळे ते भाषेचे भूत उभे करतात, किंवा सीमावाद उकरून काढतात. राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ते असे करतात,’ असे बोम्मई म्हणाले. सीमाप्रश्नावर कर्नाटकची भूमिका अतिशय स्पष्ट असून, राज्य कशालाही बळी पडणार नाही, असे बोम्मई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

‘आमच्या निर्णयावर आम्ही ठाम असून त्यांनाही (महाराष्ट्र) हे माहीत आहे. तुमच्या राजकीय अस्तित्वासाठी भाषेचा बागुलबुवा उभा करू नका किंवा सीमाप्रश्नाचा वापर करू नका, असे आवाहन मी महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांना करतो,’ असे बोम्मई म्हणाले. कर्नाटकच्या जमिनीपैकी एक इंचही जमीन देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.