प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकराचा तिच्याच घरात मृत्यू झाला. चेन्नईच्या थिरुवोट्टीयूर भागात गुरुवारी दुपारी ही दुर्देवी घटना घडली. थेन्नावन असे मृत तरुणाचे नाव आहे. आई-वडिल केरळला गेल्यानंतर थेन्नावनच्या प्रेयसीने त्याला दुपारी घरी लंचसाठी बोलावले होते. घरी आल्यानंतर काही वेळातच थेन्नावन अचानक जमिनीवर कोसळला.  कार्डिअॅक अरेस्टमुळे थेन्नावनचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

२४ वर्षीय थेन्नावनने आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. दोनवर्षांपूर्वी त्याने आयएएस परीक्षेची तयारी करण्यासाठी चेन्नई येथे घर घेतले होते. थेन्नावन ऑटोमोबाईल इंजिनियर होता. सोशल नेटवर्किंग साईटवरुन त्याची तरुणीबरोबर ओळख होती. संबंधित तरुणी कायद्याचे शिक्षण घेत आहे असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले.

दोघांच्या ओळखीचे रुपांत प्रेमात झाल्यानंतर तरुणीने नोव्हेंबर महिन्यातच तिच्या पालकांबरोबर थेन्नावनची ओळख करुन दिली होती. आई-वडिल शहराबाहेर गेल्याने ती तिच्या नातेवाईकांकडे राहायला गेली होती. पण अभ्यास करायचा असल्याने ती पुन्हा घरी आली असे तपास अधिकाऱ्याने सांगितले.

घरी आल्यानंतर तिने थेन्नावनसाठी जेवण बनवले. घरी आल्यानंतर थेन्नावन काहीवेळातच बेशुद्ध पडला व त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. तरुणीने लगेचच तिच्या नातेवाईकांना याबद्दल कळवले ते थेन्नावनला घेऊन जवळच्या रुग्णालयात गेले पण तो पर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी थेन्नावनला मृत घोषित केले. थेन्नावनच्या मृत्यूबद्दल त्याच्या आई-वडिलांच्या मनात संशय असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. प्राथमिक अहवालानुसार कार्डिअॅक अरेस्टमुळे थेन्नावनचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे काय

– हृदयाचे स्पंदन किंवा धडधड बंद होणे

– हृदयातील विद्युत क्रिया (इलेक्ट्रिकल अॅक्टिव्हिटी) बंद पडल्यामुळे निर्माण होणारा हा प्राणांतिक दोष असतो.

– हृदयाचे पंपिंग पूर्ण थांबते आणि मेंदूकडे तसेच हृदयासह शरीरातील इतर अवयवांकडे जाणारा रक्तपुरवठा बंद पडतो.

– व्यक्तीचे हृदयाचे स्पंदन पूर्ण बंद पडल्यावर व्यक्तीची शुध्द पूर्ण हरपते.

– बहुसंख्य वेळा कोणतेही लक्षण रुग्णाला आधी कळत नाही.

– काही मिनिटात कृत्रिम श्वासोच्छ्वास आणि सीपीआर देऊन तसेच यंत्राद्वारे डी.सी. शॉक, हृदयात अॅडरीनॅलिनचे इंजेक्शन देऊन काही प्रसंगी हृदय पुन्हा चालू होऊ शकते.

– हृदयाचे ठोके खूप जास्त किंवा खूप कमी पडणे किंवा अनियमित पडणे, काही हृदय विकार, हार्ट अॅटॅक, रक्तदाब खूप वाढणे किंवा खूप कमी होणे, रक्तातील पोटशियम सारख्या काही घटकांचे प्रमाण वाढणे ही या मागील कारणे असू शकतात.