Former CJI BR Gavai : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी २४ नोव्हेंबर रोजी भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली, तर मावळते सरन्यायाधीश भूषण गवई हे २३ नोव्हेंबर) सेवानिवृत्त झाले. भूषण गवई यांनी निवृत्त होण्याच्या शेवटच्या दिवशी एका महत्वाच्या प्रकरणावर भाष्य करत स्पष्टीकरण दिलं आहे.

सर्वोच्च न्यायालयात ६ ऑक्टोबर रोजी वकील राकेश किशोर यांनी भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर देशभरात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलावर मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, या घटनेनंतर भूषण गवई यांनी वकील राकेश किशोर यांना माफ करत त्यांच्या विरोधात तक्रार न करण्याचा निर्णय घेतला होता.

या घटनेवर आता भूषण गवई यांनी त्यांच्या सरन्यायाधीश म्हणून निवृत्त होण्याच्या शेवटच्या दिवशी प्रतिक्रिया देत बूट फेकणाऱ्या वकिलाला आपण माफ का केलं? याचं कारण सांगितलं आहे. भूषण गवई हे २३ नोव्हेंबर रोजी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करत निवृत्त झाले. यावेळी बी.आर. गवई यांनी त्यांच्या कार्यकाळात सर्वात नाट्यमय क्षणांपैकी एका घटनेचा उल्लेख करत वकिलाने सर्वोच्च न्यायालयात त्यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेवर भाष्य केलं. या संदर्भातील वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिलं आहे.

भूषण गवई यांनी काय म्हटलं?

भूषण गवई यांनी त्यांच्या शेवटच्या दिवशी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की त्यांना या घटनेकडे दुर्लक्ष करणं हेच योग्य वाटलं म्हणून त्यांनी बूट फेकणाऱ्या वकिलाला माफ केलं. भूषण गवई यांनी म्हटलं की, “मला वाटलं की त्याकडे दुर्लक्ष करणं हेच योग्य आहे”, असं त्यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी अनौपचारिक संवादादरम्यान पत्रकारांना सांगितलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. तसेच गवई यांनी आपण पूर्ण समाधानाने आपला कार्यकाळ पूर्ण करत पद सोडत असल्याचंही सांगितलं. त्याच बरोबर आता निवृत्तीनंतर आपण कोणतंही पद स्वीकारणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

भूषण गवई यांनी निवृत्त होताच ठेवला नवा आदर्श

भूषण गवई यांनी निवृत्तीनंतर एक नवा आदर्श ठेवला आहे. गवई यांनी निवृत्त होताच लगेचच सरकारी सुविधा सोडल्या आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शपथ घेताच भूषण गवई यांनी त्यांची अधिकृत कार लगेच तिथेच सोडत एक नवीन आदर्श प्रस्थापित केला. भूषण गवई हे शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनात त्यांच्या अधिकृत गाडीने दाखल झाले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा परत जाताना गवई हे त्यांच्या वैयक्तिक वाहनाने परतले.

न्यायमूर्ती सूर्य कांत सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश

देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी आज शपथ घेतली. न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्याकडे पुढील १५ महिने सरन्यायाधीशपदाचा कार्यभार असेल. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कलम ३७० रद्द करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकत्व हक्कांवरील प्रकरणांच्या सुनावणीत त्यांचा सहभाग होता. सूर्य कांत यांचा शपथविधी ऐतिहासिक ठरला आहे. कारण या शपथविधी सोहळ्याला सात देशांचे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित होते. भूतानचे मुख्य न्यायमूर्ती ल्योनपो नोरबू शेरिंग, केन्याच्या मूख्य न्यायमूर्ती मार्था कूमे, मलेशियाच्या संघीय न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नलिनी पथमनाथन, मॉरीशसच्या मुख्य न्यायमूर्ती बीबी रेहाना मुंगली-गुलबुल, नेपाळचे मुख्य न्यायमूर्ती प्रकाश मान सिंह राऊत यावेळी उपस्थित होते. सूर्यकांत हे सरन्यायाधीश पदावर ९ फेब्रुवारी २०२७ पर्यंत राहतील. तब्बल १५ महिने त्यांच्याकडे हे पद असेल.