‘ब्रह्मोस’ क्रुझ क्षेपणास्त्राच्या ( Brahmos Cruise Missile ) दणक्याने नुकसान झालेल्या युद्धनौकेचे फोटो समोर आले आहेत. काल आयएनएस दिल्ली ( INS Delhi ) या युद्धनौकेवरुन ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. भारतीय नौदलातील ( Indian Navy ) एका निवृत्त झालेल्या युद्धनौकेला यानिमित्ताने लक्ष्य करण्यात आले.

नक्की बघा Photos : आयएनएस वागशीर (INS Vagsheer) पाणबुडीचे शानदार कार्यक्रमात जलावतरण, लवकरच चाचण्यांना सुरुवात

तब्बल तीन हजार किलोमीटर प्रति तास एवढ्या प्रचंड वेगाने ब्रह्मोस क्षेपणास्त्र युद्धनौकेवर आदळले. जमिनीवरुन हवेत मारा करत हवेतून येणारे लक्ष्य भेदणाऱ्या संरक्षण प्रणालीला अशा वेगवान ब्रह्मोसचा वेध घेणे हे अत्यंत अवघड असल्याचं ब्रह्मोसची निर्मिती करणाऱ्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे या ब्रह्मोस क्षेपणास्त्रावर स्फोटकं नव्हती. नुसतं वेगाने आदळल्यानेच युद्धनौकेला भगडाद पडले आणि त्यानंतर युद्धनौका बुडाली. जर क्षेपणास्त्रावर स्फोटकं असती तर युद्धनौकेचा स्फोट होत आणि तिचे मोठे नुकसान झाले असते आणि युद्धनौका काही मिनिटातच बुडाली असती.

ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे आधीच नौदलाच्या विविध युद्धनौकांवर तैनात करण्यात आलं आहे. रजपुत, तलवार, शिवलिक, कोलकता, विशाखापट्टणम, निलगिरी अशा युद्धनौकांवर हे ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात आहे. तर नुकतंच दिल्ली वर्गातील युद्धनौकांवर ब्रह्मोस ही क्षेपणास्त्र प्रणाली बसवण्यात आली आहे, या वर्गातील आयएनएस दिल्ली युद्धनौकेवरुन काल चाचणी घेण्यात आली होती. अशा चाचण्या या युद्धनौकेच्या सरावाचा एक भाग असतात. यामुळे क्षेपणास्त्र हाताळण्याचा, वापरण्याचा, युद्धकालिन परिस्थितीला समोरे जाण्याचा नौसेनिकांना अनुभव मिळतोच पण त्याचबरोबर क्षेपणास्त्रांची गुणवत्ता सुद्धा तपासून बघितली जाते. ध्वनीच्या तीनपटे वेगाने ३०० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरचा लक्ष्यभेद करण्याची ब्रह्मोस क्षेपणास्त्राची क्षमता आहे. यामुळे युद्धनौकांच्या मारक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

विशेष म्हणजे भारतीय हवाई दलातील महत्त्वाचे लढाऊ विमान असलेल्या सुखोई ३० एमकेआय वरुनही काल ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.