Brain Dead Woman Alive miracle: उत्तर प्रदेशमधून एक चमत्कारीक घटना समोर आली आहे. ब्रेन डेड ५० वर्षीय महिलेला चक्क खड्डयामुळे नवे जीवन मिळाले आहे. वैद्यकीयदृष्ट्या महिला बचावण्याचे कोणतेही संकते नसताना रस्त्यावरील खड्डा तिच्यासाठी वरदान ठरला आहे. विशेष म्हणजे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर महिलेच्या अंत्यसंस्काराची तयारी देखील कुटुंबीयांनी केली होती.
डॉक्टरांकडून ब्रेन डेड घोषित
विनीता शुक्ला यांना बरेली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, डॉक्टरांनी विनीता यांना ब्रेन डेड घोषित केल्यानंतर त्या बचावण्याच्या सर्व शक्यता खोडून काढल्या होत्या. रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी त्यांना माघारी घरी नेले जात होते. रुग्णवाहिका बरेली – हरिद्वार महामार्गावर असताना एका खड्ड्यात आदळली यामुळे विनीता यांनी आयुष्याचे वरदान मिळाले, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
अंत्यसंस्काराची तयारी
विनीता यांचे पती कुलदीप कुमार शुक्ला यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना या घटनेची माहिती दिली. “घरच्यांना मी पत्नीच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यास सांगितले होते. तिचा श्वास बंद झाला होता. हृदय देखील जवळपास बंद पडले होते”, असे कुलदीप शुक्ला म्हणाले. हाफीजगंज येथे मोठ्या खड्ड्यात रुग्णवाहिका अडकली आणि बाहेर पडताना जोरात धक्का बसला, असे कुलदीप टाईम्सशी बोलताना म्हणाले.
हा एक चमत्कारच – पतीची प्रतिक्रिया
कुलदीप यांनी ही घटना एक चमत्कार असल्याचे म्हटले आहे. यानंतर पत्नी हळूहळू श्वास घेऊ लागली. यानंतर कुटुंबीयांना अंत्यसंस्काराचा विधी रद्द करण्यास सांगितले, असे कुलदीप म्हणाले. यानंतर कुलदीप यांनी पत्नीला पुन्हा पिलिभीत येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर सोमवारी पत्नीला घरी आणण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे कुलदीप यांनी सांगितले.
डॉक्टर काय म्हणाले?
“रुग्णाच्या डोळ्यांच्या तपासणीत ‘मायड्रायसिस’ (बाहुल्यांचे विस्फारणे) दिसून आले, जे मेंदू मृत झाल्याचे (ब्रेन डेड) लक्षण मानले जाते. पण, काही वैद्यकीय चाचण्यांदरम्यान, त्यांच्या रक्तप्रवाहात आणि लसिका संस्थेत घातक ‘न्यूरोटॉक्सिन्स’ आढळले. या अचूक निदानानंतर सुरू झालेल्या उपचारांमुळे त्यांच्या प्रकृतीत आश्चर्यकारक सुधारणा झाली,” असे न्यूरोसर्जननी टाईम्सला माहिती देताना स्पष्ट केले.
कुटुंबीयांची माहिती
कुटुंबीयांनी टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, विनीता पिलीभीत येथील न्यायालयात वरिष्ठ साहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. २२ फेब्रुवारीच्या संध्याकाळी घरकाम करत असताना अचानक बेशुद्ध पडल्या. त्यांना तातडीने पिलीभीत येथील राज्य वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, जिथून त्यांना पुढील उपचारांसाठी बरेली येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते.
