Latest updates on Brazilian Bungee Jumper Fall : एक विनापरवाना बंजी जंपिंगदरम्यान सुरक्षा दोरी (सेफ्टी कॉर्ड) न बांधताच १३० फूट उंच पुलावरून खाली फेकली गेल्याने एका २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जगभरातून संताप व्यक्त केला गेला. दरम्यान, १३० फूट उंचावरून खाली कोसळल्यानंतरही तिच्यात श्वास चालू होता, असं घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका नर्सने सांगितलं.
स्थानिक अहवालानुसार, जंपिंगपूर्वी कर्मचारी बंजी कॉर्ड बांधण्यास विसरले होते. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्ये ऑपरेटर तिला पुलाच्या कडेला घेऊन जाताना आणि तिथून खाली फेकताना दिसत आहेत. घटनेची माहिती मिळताच धावून आलेल्या परिचारिका रायझा डायस यांनी ब्राझीलच्या ‘डोमिंगो एस्पेक्टाक्युलर’ या टेलिव्हिजन नेटवर्कला सांगितले की, त्या रॉड्रिग्ज डी फ्रिटास हिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत खडी आणि चिखलमय टेकडीवरून खाली उतरल्या, तेव्हा ती श्वास घेत होती. डायस म्हणाल्या, “खाली उतरण्यासाठी अत्यंत तीव्र उतार होता आणि तिथे फक्त एकच दोरी उपलब्ध होती, ज्यामुळे माझ्या संपूर्ण हाताला खरचटले. तिथे सगळीकडे चिखल होता, तरीही आम्ही चालत खाली उतरत गेलो.”
डायस यांनी सांगितले की, त्यांनी त्या तरुणीला धीर देण्याचा प्रयत्न केला. “मी तिच्याशी बोलले सुद्धा. दुदा (एडुआर्डाचे निकनेम), माझ्या शिफ्टमध्ये कोणीही मरत नाही, असंही मी तिला सांगितलं. मात्र, डायस यांनी स्पष्ट केले की त्या अधिकृतपणे ड्युटीवर नव्हत्या. यानंतर तात्काळ आपत्कालीन सेवांना पाचारण करण्यात आले, परंतु रॉड्रिग्ज डी फ्रिटास हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
स्थानिक वृत्तानुसार, पीडितेने ‘एअरप्लेन स्टाईल’ (विमान पद्धती) ने जंप करण्याची विनंती केली होती. यामध्ये दोन प्रशिक्षक उडी मारण्यापूर्वी तिला आपल्या खांद्यावर उचलून धरतात आणि ती तिचे हात पसरवते.
ऑपरेटरला अटक
ब्राझीलच्या मिलिटरी पोलिसांनी सांगितलं की, आपली जीवघेणी चूक लक्षात आल्यानंतर लिमेइरा येथील घटनास्थळावरून दोन जण पळून गेले होते. नंतर हेलिकॉप्टरच्या मदतीने जवळच्या जंगलातून त्यांना शोधून काढण्यात आले. साओ पाउलो सार्वजनिक सुरक्षा सचिवालयाने दुजोरा दिला की, याप्रकरणी सहा जणांना चौकशीसाठी आणण्यात आले होते, त्यापैकी तिघांवर ‘होमिसाईड विथ इव्हेंट्युअल इंटेंट’ (अति-बेजबाबदारपणामुळे झालेल्या मृत्यूचा गुन्हा) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हा गुन्हा अशा व्यक्तींवर लावला जातो ज्यांचा थेट मारण्याचा हेतू नसतो, परंतु त्यांच्या अत्यंत निष्काळजी कृत्यामुळे एखाद्याचा जीव जातो.
मायकॉन फर्नांडिस सिंट्रा (४२), लुईस फेलिपे फेलिसियानो इगोरोफ (३२) आणि विटोर डी फ्रिटास गोन्काल्विस (२७) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, संशयितांनी सेटअप प्रक्रियेदरम्यान ‘ब्लॅकआउट’ (स्मृतीभ्रंश) झाल्याचा दावा केला असून, दोरी बांधण्यात चूक कुठे आणि कधी झाली, किंवा यासाठी कोण जबाबदार होते, हे त्यांना आठवत नसल्याचे म्हटले आहे. या घटनेमुळे ब्राझीलमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, या अनधिकृत साहसी पर्यटनस्थळावर सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते का, याचा तपास प्रशासन करत आहे.
