Padma Shri Award: ब्राझीलमधील विश्व विद्या गुरुकुलचे संस्थापक जोनास मासेट्टी यांना वेद आणि भगवद्गीतेच्या प्रचार आणि प्रसाराबद्दल केंद्र सरकारने नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. मंगळवारी राष्ट्रपती भवनात जोनास मासेट्टी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

मला हे अपेक्षित नव्हते

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर जोनास मासेट्टी यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, “मला हे अपेक्षित नव्हते. हा एक मोठा सन्मान आहे. ब्राझीलमध्ये बरेच लोक वेद शिकत आहेत. हा केवळ माझा सन्मान नाही तर या परंपरेसाठी झटणाऱ्या आमच्या कुटुंबासाठीही सन्मान आहे.”

ते पुढे म्हणाले की, “मी शेअर बाजारात काम करायचो. मी एक मेकॅनिकल इंजिनिअर आहे. मी ब्राझीलमधील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. पण माझा त्यातील रस कमी झाला होता. मी माझ्या आयुष्यात अर्थ शोधत होतो. मग मी वैदिक संस्कृतीबद्दल शिकलो आणि तामिळनाडूतील स्वामी दयानंदांच्या आश्रमात पोहोचलो.”

कोण आहेत जोनास मासेट्टी?

ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जन्मलेल्या मासेट्टी यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. शिक्षणानंतर त्यांनी ब्राझिलियन सैन्यात ५ वर्षे सेवाही केली आहे. याचबरोबर, त्यांनी शेअर बाजारात धोरणात्मक सल्लागार म्हणूनही काम केले आहे. पुढे मासेट्टी यांना योगा शिकण्याचा निर्णय घेतला, ज्यातून त्यांना आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करण्यास मदत झाली.

जोनास यांचे योग शिक्षक वेदही शिकवायचे. यामुळे त्यांना वेदांबाबतही उत्सुकता निर्माण झाली आणि त्यानंतर त्यांनी कोइम्बतूरमध्ये श्री स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांचा अभ्यास सुरू केला.

वेदांचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी ब्राझीलमधील रिओ डी जानेरो येथे विश्व विद्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेत त्यांनी वेद, संस्कृत, भगवद्गीता आणि ध्यान याचे अभ्यासक्रम सुरू केले. कालांतराने, याचा प्रसार वाढत गेला आणि त्यांच्या अनुयायांची संख्या झपाट्याने वाढत गेली.

योग आणि वेदांवर पोर्तुगीज व इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन

एवढेच नाही तर मासेट्टी यांनी योग आणि वेद या विषयांवर पोर्तुगीज आणि इंग्रजी भाषेत अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. २०२० मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलमध्ये वेद आणि भगवद्गीतेच्या प्रसारासाठी मासेट्टी यांचे कौतुक केले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brazilian engineer padma shri bhagavad gita teachings aam