Girl shaves head to protest marriage pressure: लग्नाच्या दबावाला कंटाळून तरुणीने चक्क मुंडन केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, यावरुन महिलांचे स्वातंत्र्य आणि कौटुंबिक दबावचा मुद्दा चर्चेत आला आहे. लग्नाचा दबाव झुगारुन स्वत:साठी उभं राहण्याचा निर्णय घेतला असे सांगताना तरुणीने इतर महिलांना देखील कुठल्याही दबावाला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
लग्नासाठी दबाव असल्याचा तरुणीचा दावा
घरातील लोक जबरदस्तीने लग्न करण्यासाठी दवाब टाकत होते, असा दावा ही महिला व्हिडीओतून करताना दिसत आहे. घरातल्यांच्या या दबावाला झुगारुन तरुणीने डोक्यावरील सर्व केस काढून टाकले. “इतर महिलांप्रमाणे मलाही माझे केस आवडत होते पण, मी हा निर्णय घेतला,” असे तरुणी व्हिडीओत बोलताना दिसत आहे.
काय नक्की व्हिडीओ?
“मला एक सत्य सांगायचंय. मी माझे संपूर्ण केस कापले आहेत. मलाही माझ्या केसांवर इतर महिलांप्रमाणे प्रेम आहे. तरीही मी असं केलं, काय करु? लग्नासाठी दबाव आहे माझ्यावर. मुलांनी असं केलं तर कूल म्हटलं जातं पण, मुलींनी केलं तर त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं जातं. हतबल होऊन मी हा निर्णय घेतला. हा समाज मला जगू देणाराय की नाही?”, अशा शब्दात तरुणी संताप व्यक्त करताना व्हिडीओत दिसत आहे.
इतर तरुणींना आवाहन
समाजात इतर महिलांना येणाऱ्या दबावावरुन ही तरुणी आवाहन करताना दिसत आहे. दबावाला बळी न पडता काहीतरी ठोस पाऊल उचलण्याचे आवाहन तरुणी करत आहे. “एकदा आयुष्य हातातून निसटले की कोणीच तुम्हाला विचारणार नाही. कोणीच विचारणार नाही. जे काही तुम्ही करताय ते करत राहा पुढे जा. त्यासाठी तुम्हाला जे करावं लागेल ते करा”, असे आवाहन देखील तरुणी या व्हिडीओतून करताना दिसत आहे.
नेटकऱ्यांकडून तरुणीच्या निर्णयाचे कौतुक
तरुणीच्या या निर्णयाचे नेटकऱ्यांनी तोंडभरुन कौतुक केले आहे. काजल मूव्ह या इन्स्टाग्राम खात्यावरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, याला लाखो लाईक्स, शेअर आणि कमेंट मिळाल्या आहेत. ‘महिला स्वत:साठी उभ्या राहतात तेव्हा मला जास्त आनंद होतो’, अशी कमेंट एकाने या व्हिडीओवर केली आहे. ‘मला तुझा अभिमान आहे’, अशी आणखी एकाने यावर कमेंट केलीये. ‘तुझ्या धाडसाचे कौतुक,’ अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एकाने केली आहे.
