वृत्तसंस्था, दुबई
अमेरिका आणि इराणदरम्यानचे युद्ध कायमस्वरूपी थांबवण्याच्या दृष्टीने दोहा येथे झालेल्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाल्याचे वृत्त आल्यानंतर ब्रेंट कच्च्या तेलाचा दर प्रतिबरॅल ७१ डॉलरपेक्षा खाली आले. गेल्या सलग तीन दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरांमध्ये घसरण झाली असून गुरुवारी हे दर जवळपास दोन टक्क्यांनी कमी झाले.
अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारीला इराणविरोधात युद्ध सुरू केल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरामधील ही सर्वाधिक घट आहे. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ब्रेंट कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल ७१ डॉलरपेक्षा अधिक होते. ते गुरुवारी ७०.८२ डॉलर इतके झाले. युद्ध सुरू झाल्यानंतर ब्रेंट कच्च्या तेलाचे सर्वाधिक दर ३० एप्रिल १२६ डॉलरपेक्षा अधिक झाले होते.
अमेरिका आणि इराणच्या प्रतिनिधींची मंगळवारी न झालेली चर्चा बुधवारी कतारची राजधानी दोहा येथे पार पडली. या वाटाघाटी सकारात्मक झाल्याचे कतारने जाहीर केले. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणची अण्वस्त्रे नष्ट करण्यासाठी योग्य दिशेने पावले पडत आहेत, असे म्हटले. त्यामुळे चर्चा सकारात्मक दिशेने जात असल्याचे संदेश मिळून तेलाचे दर कमी झाले.
चर्चेची पुढील फेरी अयातोल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीनंतर म्हणजे ९ जुलैनंतर होईल, असे कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.
‘अमेरिका-इराणमध्ये चर्चेत प्रगती’
इस्लामाबाद : पाकिस्तान, कतार आणि मध्यस्थ देशांनी अमेरिका व इराणबरोबर स्वतंत्र चर्चा केली असून, अनेक बाजूंवर सकारात्मक प्रगती झाल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या आणखी फेऱ्या होणार आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने सांगितले, की कतार आणि पाकिस्तानी मध्यस्थांनी दोहा येथे अमेरिका आणि इराणच्या प्रतिनिधींबरोबर स्वतंत्रपणे चर्चा केल्या. चर्चेत अनेक बाजूंवर दोन्ही बाजूंनी सकारात्मक प्रगती आहे. चर्चेची पुढील फेरी नेमकी केव्हा होणार, हे अद्याप जाहीर झालेले नाही. इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीनंतर चर्चा पुढे सुरू ठेवण्यात येणार आहे. ५ ते ७ जुलैदरम्यान खामेनी यांच्यावरील अंत्यविधी होतील. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि पाकिस्तानमधील काही मंत्री खामेनी यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहतील.
