PM Narendra Modi BRICS Summit Schedule : ब्रिक्स शिखर परिषद २०२६ दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तीन दिवसांचे राजनयिक वेळापत्रक अत्यंत व्यस्त असणार आहे. या ब्रिक्स परिषदेसाठी अनेक देशांचे अध्यक्ष आणि प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह विविध देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही इराणच्या राष्ट्राध्यक्षांसोबत बैठक होणार आहे.
११ सप्टेंबर : पुतिन, पेजेशकियन आणि गुटेरेस यांच्यासोबत बैठक
ब्रिक्स परिषदेदरम्यान मोदींच्या द्विपक्षीय बैठकांची सुरुवात शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबतच्या भेटीने होणार आहे. त्यानंतर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांच्याशी सायंकाळी सव्वासहा वाजता आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्याबरोबर सायंकाळी पावणेसात वाजता मोदी चर्चा करतील.
१२ सप्टेंबर : आफ्रिका आणि आशियाई देशांच्या नेत्यांशी चर्चा
शनिवारचा दिवस मोदींसाठी आणखी व्यस्त असेल. सकाळी दहा ते साडेअकरापर्यंत पंतप्रधान मोदी इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम, अबू धाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान आणि व्हिएतनामचे पंतप्रधान ले मिन्ह हंग यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सकाळी साडेअकरा वाजता इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांच्यासोबत स्वतंत्र बैठक होणार आहे.
शी जिनपिंग यांच्यासोबत मोदींची महत्त्वाची भेट
शनिवारच्या कार्यक्रमातील सर्वाधिक चर्चेतील बैठक चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबतची असेल. दोन्ही नेत्यांची संध्याकाळी पावणेसहा वाजता बैठक होणार आहे. भारत-चीन संबंधांमध्ये काही प्रमाणात सुधारणा होत असलेल्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
१३ सप्टेंबर : सात देशांच्या नेत्यांसोबत बैठका
ब्रिक्स परिषदेच्या तिसऱ्या दिवशीही मोदींच्या अनेक महत्त्वाच्या द्विपक्षीय बैठका होणार आहेत. या बैठका दुपारी अडीच ते संध्याकाळी सहा या वेळेत घेतल्या जातील. कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष कासिम-जोमार्ट तोकायेव, फिलिपिन्सचे फर्डिनांड आर. मार्कोस ज्युनियर, इजिप्तचे अब्देल फत्ताह अल-सिसी, दक्षिण आफ्रिकाचे माटामेला सिरिल रामाफोसा, बुरुंडीचे एव्हरिस्ट न्दायिशिमिये, नायजेरियाचे उपराष्ट्राध्यक्ष सेन. काशिम शेट्टीमा आणि युगांडाच्या उपराष्ट्राध्यक्ष जेसिका अलुपो या देशांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत मोदी चर्चा करतील.
व्यापारापासून जागतिक राजकारणापर्यंत चर्चा
तीन दिवसांच्या या बैठकांमध्ये भारताचे विविध देशांसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर राहण्याची शक्यता आहे. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण आणि रणनीतिक सहकार्याबरोबरच प्रादेशिक संघर्ष, जागतिक प्रशासन आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवरही चर्चा होऊ शकते.
जगातील बलाढ्य देश, नवीन प्रगती करणारे देश आणि भारताच्या शेजारील महत्त्वाचे मित्र देश, या सर्व देशांच्या अध्यक्ष आणि प्रतिनिधींबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होणाऱ्या बैठका भारतासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
